दरम्यान, मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून महामार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. या जोरदार पावसाचा पिकांनाही मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांची पेरणीपुर्व मशागतीची कामेही खोळंबली आहेत.
कऱ्हाड शहरासह तालुक्यात गत दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारी दुपारीही अचानक जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर मंगळवारीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. मंगळवारी सकाळपासून उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यामुळे दुपारनंतर पाऊस कोसळण्याची चिन्हे होती. दुपारी ढगांच्या गडगडाटाला सुरूवात झाली आणि त्यानंतर पाऊस कोसळला. प्रारंभी पावसाचा जोर कमी होता. मात्र, अचानक जोर वाढून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास धुवाँधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले. ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले. जोरदार पावसामुळे महामार्गावरील वाहतुकही काहीकाळ ठप्प झाली. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता.
ग्रामीण भागात सध्या शेतकरी खरीपपूर्व शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. नांगरट, सरी सोडण्यासह शेतातील कचरा वेचण्याचे कामही शेतकऱ्यांकडून केले जात आहे. मात्र, सोमवार आणि त्यानंतर मंगळवारीही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामाचा खोळंबा झाला आहे. सखल भागातील शिवारात मंगळवारच्या पावसाने पाणी साचले असून मशागतीच्या कामाला आता उशीर होणार आहे. टोमॅटोसह वेलवर्गीय पिकांचे या पावसाने नुकसान झाले असून शेतकरी हताश झाले आहेत.
- चौकट
ईदगाह मैदान मार्ग पाण्याखाली
विजय दिवस चौक ते रत्नागिरी गोडाऊन मार्गावर ईदगाह मैदान परिसरातील रस्ता जलमय झाला. नाला तुंबल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. या रस्त्यातून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागली.
- चौकट (फोटो : ०१केआरडी०५)
हॉस्पिटलचा तळमजला जलमय
कोल्हापूर नाक्यानजीक असलेल्या कऱ्हाड हॉस्पिटलचा तळमजला जलमय झाला. याठिकाणी कोरोना वॉर्ड असून रुग्णांच्या नातेवाईकांची यावेळी धावपळ उडाली. रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला.
- चौकट (फोटो : ०१केआरडी०४)
मार्केट रस्ता, शाहू चौकात तळे
शहरातील पोपटभाई पेट्रोल पंप चौक ते भेदा चौकाकडे जाणारा मार्केट रस्ता जोरदार पावसाने पाण्याखाली गेला. तसेच शाहू चौकातील रस्त्यावरही तळे निर्माण झाले. याठिकाणी काही दुकानगाळ्यांमध्ये पाणी गेल्याने व्यावसायीकांचे नुकसान झाले.
फोटो : ०१केआरडी०३
कॅप्शन : कºहाड शहरासह तालुक्याला मंगळवारी दुपारी जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले होते. (छाया : अरमान मुल्ला)