कऱ्हाड : येथील कऱ्हाड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२०२५ वर्षाच्या स्पर्धेत देशाच्या पश्चिम विभागात ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, कराड पालिका मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देशाच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या पाच राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांतील ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिकांमध्ये कराड पालिकेने द्वितीय क्रमांक मिळवला. यापूर्वी २०१९ व २०२० अशी दोन वर्षे कऱ्हाडने देशात प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावला होता. दिल्ली येथे गुरुवारी झालेल्या या पुरस्कार वितरणप्रसंगी पालिकेचे शहर समन्वयक आशिष रोकडे, विभागप्रमुख संदीप रणदिवे, मुकादम किरण कांबळे, शेखर लाड, फैयाज बारगिर, अशोक डाईंगडे, संजय तावरे, स्वप्निल सरगडे यांची उपस्थिती होती. या यशाबद्दल कराडकर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. कऱ्हाड पालिकेत अधिकारी व कर्मचारी यांनी जल्लोष केला.
Satara: स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कऱ्हाड नगरपालिकेचा देशात डंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:31 IST