चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात चाळीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच बुधवारी पडलेल्या जोरदार पावसाने डेरवण पाझर तलाव अवघ्या पाच तासांत पूर्ण क्षमतेने भरला. पाणी सांडव्यावरुन वाहू लागले आहे. त्यामुळे विभागातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हला गळती लागल्याने किती काळ हा पाणीसाठा तलावात राहणार, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.
वाघजाईवाडी व डेरवण हद्दीत हा तलाव उभारण्यात आला आहे. १९७८मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत या तलावाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षांनी १९८०मध्ये तलावाचे काम पूर्णत्वास गेले होते. ४५ एमसीएफटी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या तलावाला १९८५मध्ये तडे गेले होते. त्यामुळे हा तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली होती.
वाघजाईवाडी, खोनोली, मधलीवाडी, डेरवण, गमेवाडी, दाढोली येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून भराव टाकून तलाव भक्कम केला होता. या तलावाच्या पाण्यावर चाफळ विभागातील दाढोली खोऱ्यासह कऱ्हाड तालुक्यातील खालकरवाडी, चरेगाव, उंब्रज परिसरातील हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळते. कऱ्हाड, पाटण तालुक्यातील शेत जमिनीला पाणी मिळावे, या हेतूने डेरवण पाझर तलावाला मंजुरी देण्यात आली होती. या तलावामुळे शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटतो. तलावाच्या पाण्यावर परिसरातील शेतकरी उन्हाळी पिके घेऊन आपले आर्थिक जीवनमान सुधारतात. परंतु, पाणी साठवण विहिरीसह व्हॉल्व्हची दुरवस्था झाल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला आहे.
या तलावाची देखभाल कोयना जलसिंचन लघु पाटबंधारे खात्यांतर्गत तारळी-चाफळ सिंचन लघु पाटबंधारे खात्यामार्फत केली जाते. या पाझर तलावाची उंची कमी असल्याने आणि गळतीमुळे पाणीसाठ्याचे प्रमाण घटले आहे. त्यातच शासनाचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. हा तलाव उन्हाळ्यात कोरडा पडतो. या तलावाचे पाणी उत्तरमांड नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे चाफळ, माजगाव, कऱ्हाड तालुक्यातील खालकरवाडी गावच्या शेतीला पाणी पुरत होते. हे पाणी पुरत नसल्याने या बंधाऱ्याची उंची वाढवून व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.