दरम्यान, कालगाव-तारगाव येथील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
कोल्हापूर ते सातारा दरम्यान निरीक्षण दौऱ्यासाठी महाव्यवस्थापक संजय मित्तल हे कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज, सांगली आणि सातारा दौऱ्यावर आले होते. त्या वेळी शेतकरी संघटनेचे अनिल घराळ, विनायक जाधव, विकास थोरात यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेच्या दुपदरी करण्याच्या कामात जाणार आहेत त्यांना भरपाई देण्यात यावी. त्यांचे खरेदीपत्र करून देण्यात यावे. रेल्वेच्या खालून पाइपलाइन घालण्यासाठी परवानगी देण्यात यावी. शेतकऱ्यांना रेल्वे रुळावरून ये-जा करण्यासाठी मोफत परवानगी देण्यात यावी, यासह अन्य मागण्या केल्या आहेत.
- चौकट
श्रीनिवास पाटील यांनीही घेतली दखल
सातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मध्य रेल्वे दुहेरीकरणाच्या भूसंपादन व शेतकऱ्यांच्या रेल्वे लाइनलगतचे शेतात जाणारे शिवार रस्ते, शेतीच्या पाण्याच्या पाइपलाइनचे मोफत क्रॉसिंग, प्रकल्पग्रस्त दाखले या समस्येवर खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांची न्याय्य बाजू घेत तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याशी बैठक घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगत रेल्वे प्रशासनाला या प्रश्नाची दाहकता समजावून दिली होती.