जगदीश कोष्टीसातारा : वकिली हा केवळ पैसा कमविण्याचा व्यवसाय नसून न्याय मिळवून देण्याची सेवा आहे, ही भावना मनात बाळगून कोरेगावचे जयवंत केंजळे कुटुंबीय वकिली सेवा बजावत आहे. कोरेगाव तालुका, सातारा जिल्हा सत्र, मुंबई उच्च न्यायालय अन् सर्वोच्च न्यायालयात एक मुलगा, सून कार्यरत आहेत. या कुटुंबातील नऊजण वकिली करीत आहेत.जगभर १५ मे हा जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय माणूस हा कुटुंबवत्सल मानला जातो. बहुतांश कुटुंबांत आजी-आजोबा, आई-वडील, मुलं एकत्र राहतात. एकत्र कुटुंब हीच त्या घराची ताकद असते; पण काही कुटुंब असेही असतात की, एखाद्या क्षेत्रात झपाटल्यासारखे काम करतात. यासाठी चार भिंतींत अडकून राहत नाहीत. अशांपैकीच एक कुटुंब म्हणजे कोरेगावचे केंजळे कुटुंब.
ॲड. जयवंत केंजळे यांचे मूळ गाव हे खटाव तालुक्यातील ललगुण. त्यांच्या वडिलांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. तेथून निवृत्त झाल्यानंतर व्यवसायाच्या निमित्ताने ते कोरेगावात स्थायिक झाले. ॲड. जयवंत केंजळे यांनी विज्ञान शाखेतून पदवी संपादन केली. त्यानंतर वकिलीचे शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात त्यांनी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून तीन वर्षे कामही केले. त्यांनी वर्ष १९७६ पासून कोरेगावातून वकिलीस सुरुवात केली. त्यांचे या पेशावर प्रचंड प्रेम असल्याने त्यांनी अख्खं कुटुब या क्षेत्रात आणले.त्यांचेच बंधू ॲड. श्रीकांत केंजळे यांनी मुंबईतून ‘एमबीए’चे शिक्षण घेतले. काही काळ नोकरीही केली; पण तेथे फार काळ रमले नाहीत. त्यामुळे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेऊन सातारा जिल्हा न्यायालयात वर्ष १९८८ पासून वकिली सुरू केली. त्यांची पत्नी संगीता याही जिल्हा न्यायालयात सेवा बजावत आहेत. त्या कवयित्री, लेखिका आहेत.
जयवंतराव यांना दोन मुलं. त्यातील अजित यांनी उच्च न्यायालयात वकिली करावी म्हणून त्यांना वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला पाठवले. दुसऱ्या वर्षापासूनच वकील मित्राकडे त्यांना व्यवहारज्ञान मिळावे म्हणून पाठविले. सकाळी कॉलेज करून दिवसभर न्यायालयात जात. ते गेली २३ वर्षे उच्च न्यायालयात सेवा बजावीत आहेत. त्यांच्यासोबत अजित यांची पत्नी उत्कंठा याही वर्ष २००४ पासून उच्च न्यायालयातच वकिली करत आहेत. दुसरे चिरंजीव अभिजित आणि त्यांची पत्नी अश्विनी दोघेही सातारा व कोरेगाव न्यायालयात बारा वर्षांपासून सेवा बजावत आहेत.श्रीकांत यांचीही मुलं याच क्षेत्रात आहेत. एक मुलगा प्रशांत हे सर्वोच्च न्यायालयात सेवा बजावत आहेत. सर्वोच्च न्यायालयातच कर्तव्य बजवायचे म्हणून त्यांना वकिलीच्या शिक्षणासाठी दिल्लीला पाठवले. तेथेही शिक्षण घेत असतानाच नामांकित वकील मित्रांकडे पाठवले जात. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान चांगले मिळत. गेली बारा वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्यांच्यासोबतच पत्नी मोहिनी या वकिली करत आहेत. त्यांनी लग्नानंतर वकिलीचे शिक्षण घेऊन सेवा बजावत आहेत.
ही जपली पथ्ये
- एखाद्या पक्षकाराने फी दिली नाही म्हणून मधूनच त्याला सोडायचे नाही. खटल्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच थांबायचे.
- मुंबई, दिल्लीत येणारे पक्षकार हे ग्रामीण भागातून येतात. तेव्हा ते कसे आले, त्यांनी चहा, नाश्ता केला का नाही, याची अगोदर चौकशी करावी. त्यांचे हित जोपासावे.
वकिली हा केवळ पैसे कमविण्याचा व्यवसाय नाही. वंचितांना न्याय मिळवून देणे, लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी खांद्यावर घेण्याची सेवा आहे. त्यामुळे मुलं, सुनाही हे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. - ॲड. जयवंत केंजळे.