सातारा : ‘गेल्या तीन वर्षांपासून सातारा नगर पालिकेत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शेकडो विकासकामे रखडली असून, आता शिक्का बनून राहण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेपर्यंत मी पोहोचलो असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करून लवकरच याचा निर्णय घेईन,’ अशी माहिती नगरविकास आघाडीचे नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पालिका प्रशासनाकडून नागरिकांची कामे होत नाहीत, नगरसेवकांचे प्रशासन ऐकत नाही, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा होत नाही, विकास योजना कागदावरच राहतात, प्रशासन विकास योजना हाणून पाडतात, अशा विविध मुद्द्यांवर नाराज असलेले नगरविकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक जयेंद्र चव्हाण याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कानावर सर्व गोष्टी घालून ते देतील, त्या आदेशाप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे सांगितले.सातारा पालिका प्रशासनाकडून नागरिकांचे कामे होत नाहीत, नगरसेवकांचे प्रशासन ऐकत नाही, विकास योजना राबविल्या जात नाहीत, त्या कागदावरीच राहतात, प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन आणि पाठपुरावा करून कामे होत नाहीत. त्यामुळे नाराज असलेल्या नगरविकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनी वार्डातील कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाच्या विरोधात पदाचा राजीनामा देण्याची भूमिका मांडली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ‘राजीनामा देण्यापेक्षा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू, मोर्चे काढू, प्रसंगी उपोषण करू; परंतु राजीनामा देऊ नका,’ अशी कार्यकर्त्यांनी विनंती केली. त्यानंतर याबाबतची सर्व माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या कानावर घालून नंतर काय तो निर्णय घ्यायचा, असे बैठकीत ठरले.दरम्यान, याबाबत नगरसेवक जयेंद्र चव्हाण म्हणाले, ‘पालिकेच्या कारभाराबाबत आणि कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, याबाबत आपण नेहमीच अशा बैठका घेत असतो. राजीनामा देण्याबाबतच्या भूमिकेबाबत चर्चा झाली हे खरे आहे; परंतु पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना माहिती सांगणार असून, ते ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे निर्णय घेणार आहे.’ (प्रतिनिधी)
जयेंद्र चव्हाणांकडून राजीनाम्याचा बाँब
By admin | Updated: December 16, 2014 00:11 IST