कुडाळ : जावळी तालुक्यात प्राथमिक शिक्षक संघाचे अधिक प्राबल्य आहे. तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात काम करताना वेळोवेळी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांची बाजू मांडत प्रलंबित प्रश्न सोडवून शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तालुक्यातील सायगाव, मेढा, कुडाळ, बामणोली, केळघर, करहर भागात शिक्षक संघाचे प्राबल्य अधिक आहे. संघाने शिक्षक बँक निवडणुकीत एकसंध दाखवत कुडाळ, मेढा गटात आपले उमदेवार विजयी करून आपली ताकद दाखवून दिली आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघाने नेहमी प्राधान्य दिल्यामुळे संघाची जिल्ह्यात ताकद वाढलेली आहे. जावळीसारख्या डोंगरी तालुक्यातील शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघाने प्रशासकीय पातळीवर वेळप्रसंगी दबाव आणून सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. तालुक्यात जिल्हाबाह्य काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या अधिक आहे. या शिक्षकांना बरोबर घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी देखील या संघटनेने प्रयत्न केल्यामुळे बँकेचे तालुक्यातील दोन्ही उमेदवार संघाला निवडून आणण्यात यश आले. यावेळी संघटनेने आपली मोर्चेबांधणी जोरदार सुरू केली असून, संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे या मान्यवराच्या उपस्थितीत दि. २४ रोजी मेढा येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी नूतन तालुका कार्यकारिणी निवडली जाणार आहे तसेच संघटनेच्या वाटचालीसंदर्भात चर्चा होणार आहे. अधिवेशनास जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण सभापती अमित कदम, सभापती सुहास गिरी, संभाजीराव थोरात, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी, न्याय मागण्यांसाठी शिक्षक संघाने वेळोवेळी शासन दरबारी प्रयत्न केले आहेत. यापुढेही संघटना शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.- मच्छिंद्र मुळीक, शिक्षक संघ, जिल्हाध्यक्ष
जावळी तालुका शिक्षक संघ ताकद दाखवणार
By admin | Updated: January 21, 2015 23:50 IST