मल्हारपेठ/वाई : निवडणुकीच्या काळात भाजपकडून प्रक्षेपित करण्यात येणारी जाहिरात महाराष्ट्राचा अपमान करणारी आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्र तसा नसतानाही जाहिरातीतून तो दाखविला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील प्रचार सभेत केली.वाई येथे मकरंद पाटील आणि मल्हारपेठ येथे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी भाजपच्या जाहिरातींच्या अनुषंगाने मोदी सरकारवर प्रहार केला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र जणू काही रसातळालाच गेला आहे. अशी वातावरण निर्मिती भाजपच्या जाहिरातीतून केली जात आहे. यामुळे राज्याची संपूर्ण देशात बदनामी होत आहे. मोदी सरकारने निर्यातबंदीचे धोरण राबविल्यामुळे फळ, दूध आणि काद्यांचे दर झपाट्याने कमी झाले.’ नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार तीन महिन्यांत घेतलेल्या निर्णयामुळे लोकप्रियता हरवून बसले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आला. परिणामी त्याचा फायदा देशातील ६७ टक्के जनतेला झाला. मात्र, मोदी सरकार देशातील संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम करत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.घोडं आहे तेथेच आहे...शरद पवारांनी मल्हारपेठेतील सभेत शंभूराज देसाई यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘स्वत:च्या हातात कारखाना असणाऱ्यांना तो नीट संभाळता येत नाही. राज्यातील बहुतांशी कारखाने प्रतिदिन चार हजार टन गाळप करतात; मात्र कोठेही प्रतिदिन १२५0 टन गाळप करणारा कारखाना नाही. मात्र, यांच्या कारखान्याचं घोडं आहे तेथे आहे.’ पवारांच्या या वाक्यावर सभेत चांगलाच हशा पिकला. शरद पवारांनी दोन्ही सभेत मकरंद पाटील आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्या तरुणाईचा गौरव करत राष्ट्रवादीच्या या चेहऱ्यांना संधी देण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीने नेहमीच नव्या पिढीच्या कर्तृत्वाला वाव दिल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला.
भाजपच्या जाहिरातीत महाराष्ट्राचा अपमान
By admin | Updated: October 5, 2014 00:18 IST