कडेगाव : साखर कारखानदार आणि राज्य शासन एफआरपीचा कायदा मोडून ऊस उत्पादकांवर अन्याय करीत आहेत. याविरुद्ध गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने कडेगावात तहसील कार्यालयासमोर अॅड. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कारखानदार व सरकारचा निषेध करण्यात आला.ऊस उत्पादकांना उसाची किंमत एफआरपीप्रमाणे एकरकमी व ताबडतोब मिळाली पाहिजे. गळीत हंगाम सुरू होऊन ४० ते ४५ दिवस झाले, तरी अद्याप जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एक रुपयाही दिलेला नाही. ऊस तुटल्यापासून १४ दिवसांच्या आत उसाची रक्कम मिळाली पाहिजे, असे कायदा सांगतो. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्यात सरकारची आहे. परंतु राज्य सरकार कायदा मोडला म्हणून कारखानदारांवर काहीच कारवाई करीत नाही. याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे अॅड. पाटील म्हणाले. यावेळी कडेगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश लोखंडे, सुभाष पवार, परशराम माळी, इंद्रजित पाटील, नारायण वाघमोडे, विलास कदम, मारुती पवार, श्रीरंग यादव, पांडुरंग कुंभार, सुनील जगताप, सचिन मोरे, राजेंद्र माने, डॉ. अभिमन्यू जाधव आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटना, स्वभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. (वार्ताहर)कडेगाव येथे आंदोलन सुरू असताना, आंदोलनकर्त्यांना सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम भेटले. ‘मीही तुमच्याबरोबर आहे, मीही शेतकरी आहे’, असे कदम यांनी सांगितले. यावेळी अॅड. पाटील यांनी, ‘मोहनरावदादा आमच्याबरोबर आहात, तर तुम्हीच कोंडी फोडा’, असे सांगितले. यावर कदम यांनी, दोन दिवसात पुणे येथे बैठक आहे. या बैठकीत निश्चित तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.
‘एफआरपी’चा कायदा मोडून शासनाकडून अन्याय
By admin | Updated: December 17, 2015 22:48 IST