सातारा : भारत देश आज स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. मधल्या दोन वर्षांचा कालखंड कोरोनाच्या जोखडातच गेला. कोरोना रोखण्यासाठी केलेले लॉकडाऊन आणि त्यामुळे झालेली उपासमार आता टळणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून जिल्हा निर्बंधमुक्त होणार असून स्वातंत्र्यदिनाची पहाट आता निर्बंध मुक्तीतच उजाडणार आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी निर्बंध हटविण्याचा आदेश जाहीर केला अन् सातारकरांना मोठा दिलासा मिळाला. आता उद्योग व्यवसाय पूर्ववत होऊन हाताला काम मिळणार असल्याने सर्वांनीच सुस्कारा सोडला आहे. सर्व प्रकारच्या दुकानांच्या वेळा दुपारी ४ वरून रात्री १० वाजेपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. आता दुकाने बंद करण्याची घाई होणार नाही, तसेच दुकाने बंद होतील म्हणून दुपारच्यावेळेत गर्दीही होणार नाही. तालमींमध्ये
कडक निर्बंधांमुळे उद्योगधंदे रसातळाला गेले. व्यापारी वर्गावर कर्जाचा डोंगर साठला, तसेच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हाताला काम नसल्याने लोक आत्महत्येचे पाऊल उचलू लागले. अनेकजण नैराश्येमध्येच आहेत. आता निर्बंध उठले आहेत. स्वातंत्र्याची पहाट नवीन आशा घेऊन येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार व रविवार हे दोन दिवस असणारी संचारबंदी देखील हटवलेली आहे. आदेशाची अंमलबजावणी शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून केली जाणार आहे. जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हिटी रेट १० पेक्षा कमी असल्याने जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रामपंचायत स्तरावर कोविड प्रतिबंधात्मक खालील अटी व शर्तींचे अधिन राहून ऑफलाईन ग्रामसभांचे आयोजन करण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
ग्रामसभा कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सक्तीने मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक राहील. यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सॅनिटायझर उपलब्ध ठेवावे. हस्तांदोलन व धूम्रपान करण्यास सक्त मनाई राहील. ग्रामसभेच्या कार्यक्रमामध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान १ मीटर सामाजिक अंतर राहील. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करणार आहेत त्या ठिकाणच्या हॉलमध्ये ग्रामसभेपूर्वी व ग्रामसभा संपल्यानंतर संपूर्ण सॅनिटायझेशन करणे बंधनकारक राहील. महाराष्ट्र शासनाकडील सूचननेनुसार सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारची धार्मिकस्थळे नागरिकांसाठी बंद असल्याने कोणत्याही परिस्थितीत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यास मनाई राहील.
आजारी व्यक्तींना ग्रामसभेत प्रवेश नाही
आजारी असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत ग्रामसभेमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. ग्रामसभेचे ठिकाण कंटेन्मेंट झोनमध्ये मोडत असल्यास त्या ठिकाणी संबंधित उपविभागीय अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले कोविडविषयक सूचनांचे तंतोतंत पालन करणे आयोजकांवर बंधनकारक राहील.
अब तुम्हारे हवाले वतन साथियों...!
स्वातंत्र्यदिनी देशभक्तिपर गीते वाजणार आहेत. ग्रामसभा लोकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडणार असल्याने चावड्या गजबजणार आहेत. बाजारपेठाही फुलून जाणार आहेत. ही गीते गात असताना कोरोना संसर्ग रोखण्याची मोठी जबाबदारी सर्वांवरच आहे. अब तुम्हारे हवाले वतन साथियों...हे गीत सर्वांनाच मंत्रमुग्ध करेल...आता आपल्याला आपल्या लोकांची काळजी घ्यावी लागेल. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळल्यास पुन्हा निर्बंधाचे जोखड पाठीवर बसणार नाही.
फोटो नेम : १४जावेद
फोटो ओळ : सातारा येथील बाजारपेठेत शनिवारी दुकाने बंद असल्याने गर्दी कमी होती. रविवारी मात्र वेगळे चित्र दिसणार आहे. (छाया : जावेद खान)