तरडगाव : तरडगाव (ता. फलटण) परिसरात स्वातंत्र्यदिन साध्या पद्धतीने व शांततेत साजरा करण्यात आला. आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते येथील जिल्हा बँक शाखेच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.
तरडगाव विकास सोसायटी येथे माजी सभापती वसंतराव गायकवाड, जुनी ग्रामपंचायत कार्यालय व वेणूताई चव्हाण हायस्कूलमध्ये सरपंच जयश्री चव्हाण, ग्रामसचिवालयासमोर उपसरपंच प्रदीप गायकवाड, जिल्हा परिषद शाळेत गणेश गायकवाड यांच्या हस्ते झेंडावंदन झाले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व चाळशी मळा शाळेत ध्वजारोहण केले. काळज येथे सरपंच संजय गाढवे यांनी झेंडावंदन केले. यानंतर पुरात सापडून व दरडी कोसळून प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. भुरकरवाडीत ज्येष्ठ ग्रामस्थ शांताराम पवार, कुसुर येथे सरपंच राधा आवटे यांनी तर पाडेगावमध्ये सरपंच स्मिता खरात यांनी राष्ट्रध्वज फडकवला. विठ्ठलवाडी येथे सरपंच शीतल कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. परिसरातील विविध गावे व वाड्या-वस्त्यांवरील शाळांमध्ये शांततेत व साध्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.