लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषदेतील सभापती बदलाच्या हालचाली गतिमान झाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत बराच खल झाला. त्यातच इच्छुकांची संख्या वाढल्याने निर्णयाविनाच बैठक संपल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे विद्यमानच कायम राहण्याची शक्यता असल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी पडणार आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पुढीलवर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही सदस्यांनी सभापतीपद मिळावे म्हणून देव पाण्यात घातले आहेत. कारण, पहिल्या अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर मागीलवर्षी जानेवारी महिन्यात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. त्यानंतर ९ जानेवारीला सभापतींची निवड झाली होती. सभापतींची निवड होण्यापूर्वी साताऱ्यातील झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सभापती पदाचे दावेदार मागे पडले आणि अनपेक्षितपणे काही नावे समोर आली.
सभापती पदाची नावे जाहीर केल्यानंतर राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी एक वर्षासाठी पदे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यावेळी नाराज झालेले दावेदार वर्ष कधी संपते याची वाट पाहत होते. हे वर्ष संपल्यानंतर त्यांनी आपापल्या नेत्यांकडे वारंवार सभापती पदाची मागणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली.
या बैठकीला रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह पक्षाचे आमदार आणि जिल्ह्यातील पक्षाचे इतर पदाधिकारीही होते, असे सांगण्यात आले. पण, सभापती पदासाठी इच्छुक वाढल्याने नुसताच खल झाला. त्यामुळे कोणताही निर्णय झाला नसल्याचीही माहिती समोर येत आहे. परिणामी राजकीय घडामोडीत विद्यमान सभापती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चौकट :
निवडणुकांमुळे बदल नको...
अंतिम निर्णय बाकी...
जिल्ह्यात आगामी काळात अनेक निवडणुका होत आहेत. तसेच वर्षभरात जिल्हा परिषदेचीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी, सभापतींचा बदल नको, अशी भूमिका घेतली. तसेच विकास कामांना प्राधान्य द्यावे, अशी चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा मावळण्याची चिन्हे आहेत. तरीही अंतिम निर्णय होणे बाकी आहे.
...........................................................