पुसेगाव: :
कोरोना महामारीमुळे सुमारे गेल्या दीड वर्षापासून शालेय शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना संगणक आणि मोबाइलच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’ पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र ‘ऑनलाइन’मुळे विद्यार्थ्यांचा वही आणि पेन यांचा संबंध खूपच कमी झाला असून याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या लेखन शैली व दृष्टीवर झालेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या बोटांची हरवलेली हस्ताक्षराची गती आणि लहान वयात निर्माण होत असलेले दृष्टिदोष यामुळे पालकही चिंता व्यक्त करत आहेत.
कोरोना महामारीचा समाजातील सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांचे व्यवसाय बुडाले असून लहान-मोठे व्यापारी, दुकानदार, मजुरांचे आणि शेतकामगार वर्गाचे खूपच हाल झाले आहेत. याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. गेल्या सुमारे दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ‘ऑनलाइन’मुळे ग्रामीण, व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना संगणक व मोबाइल रेंजअभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर समाजातील बहुतांशी मुलांच्याकडे त्यांच्या आर्थिक परिस्थितीअभावी मोबाइलच नसल्यामुळे त्यांना ‘ऑनलाइन’ शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. सतत संगणक किंवा मोबाइलचे स्क्रीनसमोर बसून तासन्तास अध्ययन-अध्यापन केल्यामुळे याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर होत असल्याच्या तक्रारी अनेक पालक व्यक्त करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये सुंदर व मोत्यासारख्या वळणदार हस्ताक्षराला तर व्यावहारिक जीवनात दृष्टीला महत्त्व आहे. कोरोनामुळे या दोन्हीही गोष्टी लहान वयातच मुलांना त्रासदायक ठरू लागल्याने पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या सुमारे दीड वर्षापासून शाळाच बंद असल्यामुळे आणि ‘ऑनलाइन’ पद्धतीने शिक्षण सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाताला वही व पेनचा संबंध आलाच नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी लिखाणाच्या सरावापासून दूर गेले. तासन्तास संगणक व मोबाइल स्क्रीनसमोर असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांचे दृष्टीवर झाला असून शेकडो विद्यार्थ्यांच्यामध्ये दृष्टिदोषाच्या किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दिसून येत आहेत. यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना चष्मा आणि मोडलेला लिखाणाचा सराव यामुळे पालकवर्गात चिंतेचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.