स्ट्रॉबेरीला मागणी
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्याचे मुख्य पीक असलेल्या स्ट्रॉबेरी या फळाला पर्यटकांमधून मागणी वाढू लागली आहे. यंदा अवकाळी पावसाचा या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. या नुकसानीतून उभारी घेत शेतकऱ्यांनी पुन्हा स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली. सध्या फळाला पोषक वातावरण असून, उत्पादनातही वाढ होऊ लागली आहे. स्ट्रॉबेरीचे दर प्रतिकिलो दीडशे ते दोनशे रुपये असल्याने पर्यटकांमधून मागणी वाढू लागली आहे.
वाहतूक कोंडीने
वाहनधारक त्रस्त
सातारा : शहरातील तांदुळआळी, चांदणी चौक व खणआळी या परिसरात वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक खासगी तसेच मालवाहतूक करणारी वाहने रस्त्याकडेला लावली जात असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. याचा पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिका व पोलीस प्रशासनाच्यावतीने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
नैसर्गिक ओढ्यांत
कचऱ्याचे साम्राज्य
सातारा : शहरात काही ठिकाणी घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे घंटागाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना घरात साचलेला कचरा चक्क ओढ्यात टाकावा लागत आहे. त्यामुळे नैसर्गिक ओढ्यांत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत.
सध्या पालिकेने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला आहे. या मोहिमेतून शहर स्वच्छतेबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. असे असताना ओढ्यात साचणाऱ्या कचऱ्यामुळे शहराचे सौंदर्य बकाल होऊ लागले आहे.