कऱ्हाड : ‘तारळीचे पाणी बंद कॅनॉलमधून माढा मतदारसंघाला नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाणी द्यायला आमचा विरोध नाही. मात्र, त्याच वेळी धरण जेथे झाले, त्या लगतचे ७५ टक्के क्षेत्र कोरडी ठेवून हे पाणी जाणार असेल, तर ते आम्ही चालू देणार नाही,’ असा इशारा आमदार शंभूराज देसाई यांनी दिला.कऱ्हाड विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवदौलत बँकेचे चेअरमन अॅड. मिलिंद पाटील, कऱ्हाड खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण यांची उपस्थिती होती.आ. देसाई म्हणाले, ‘माळीण दुर्घटनेच्या अनुषंगाने तालुक्यातील बोरगेवाडी, जिमनवाडी गावांचे पुनर्वसन व्हावे, अशी लक्षवेधी सूचना मांडली. तारळी, मराठवाडी व कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे उपसा जलसिंचन मंत्री गिरीश महाजन पुढील महिन्यात तालुक्याचा दौरा करणार आहेत. कोयना भूकंपग्रस्तांना दाखले पूर्ववत सुरू करावे, राज्याला वीज पुरवणारे कोयना धरण तालुक्यात असल्यामुळे किमान तालुका पूर्णत: भारनियमनमुक्त व्हावा, तालुक्याच्या क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न दहा वर्षांपासून प्रलंबित असून, यासाठी शासकीय जागा मिळत नसल्याने हे एखाद्या शिक्षण संस्थेच्या जागेमध्ये उभारावे व त्याची देखभाल संस्थेकडे सोपवावी. तालुक्यात १६ आरोग्य केंद्रे व ६० उपकेंद्रे आहेत. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असून, किमान डोंगरी भागामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी असावा, तसेच साखर कारखानदारांना किमान एखादीआरपी देता यावी, यासाठी केंद्राने अनुदान द्यावे,’ अशा सूचना तारांकित व लक्षवेधी प्रश्नामध्ये मांडल्या असून, शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे आमदार देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चुकीचे असेल ते बंद करू...भाजप-शिवसेना युती शासनाच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात १६ प्रश्न उपस्थित करून मतदारसंघातील अनेक प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका मी बजावली. त्याचबरोबर कृष्णा खोरे कालव्याचे काम पाटण तालुक्यात चुकीच्या पद्धतीने झाले आहे. याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना दिली असून, त्यांनी तत्काळ या भागाचा दौरा करून ‘जे चुकीचे झाले असेल ते बंद करू,’ असे आश्वासन दिले आहे, अशी माहितीही आमदार देसाई यांनी यावेळी दिली.
...तर माढ्याला पाणी नाही!
By admin | Updated: December 26, 2014 23:49 IST