वाई : कोरोनाचा धुमाकूळ सुरू असून, अर्थव्यवस्था डबघाईस आलेली आहे. सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे सर्व मार्ग खुंटले असून, त्यांची आर्थिक ओढाताण सुरू आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या अधिवेशन काळात जनतेची वीज कनेक्शन तोडू नयेत, अन्यथा वीज कार्यालयास टाळे ठोकले जाईल, असा इशारा ‘रिपाइं’च्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी यांना दिलेल्या निवेदनात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी म्हटले आहे की, या काळामध्ये वीज तोडणी झाली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तसेच सर्वसामान्य जनतेचे जीणे जगणे मुश्कील होईल. जनतेला विश्वासात घेऊन कोरोना काळामधील वीज विलाचे वर्गीकरण करून त्या बिलाचे १५ ते २० हप्ते करून टप्प्याटप्प्याने वीज बिलाची वसुली करावी. तसेच कालावधीमधील कोणत्याही वीज बिलावर दंड व व्याजाची आकारणी करू नये. जर आपण आमचे निवेदनावर गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला नाही तर आम्ही पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करू.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, श्रीनिवास घाडगे, बाजीगर इनामदार, रूपेश मिसाळ, नित्यानंद मोरे, सुनील मांढरे यांच्या सह्या आहेत.