सातारा : येथील प्रतापगंज पेठेतील आयडीबीआय बँकेच्या शाखेतून पाच अज्ञात चोरट्यांनी तब्बल साडेचार लाखांची रोकड दिवसाढवळ्या लुटून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तब्बल ४८ तासांनंतर अज्ञात पाचजणांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. येथील प्रतापगंज पेठेतील आयडीबीआय बँकेची शाखा सोमवारी (दि. ३) सकाळी नेहमीप्रमाणे दहा वाजता उघडण्यात आली. दिवसभर बँकेचे व्यवहार झाले. दुपारी तीन वाजता बँकेत पैसे भरणे बंद झाल्यानंतर कॅशिअरने रक्कम मोजली. मात्र, त्यामध्ये साडेचार लाखांचा फरक असल्याचे दिसून आले. संगणकामध्ये काहीतरी गडबड असेल, असे समजून बँकेतील अधिकाऱ्यांनी पुन्हा रोकड मोजली. तरीही साडेचार लाखांची तफावत समोर येऊ लागली. अखेर बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी दुपारी एकच्या सुमारास पाचजण बँकेत आले होते. त्यातील दोघांंनी बँकेतील कॅशिअरला बोलण्यात गुंतवून ठेवले, तर एकाने आतमध्ये जाऊन पत्र्याच्या पेटीतील साडेचार लाखांची रोकड हातोहात लांबविल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. दिवसाढवळ्या हा प्रकार घडला असताना बँकेतील एकाही कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार कसा निदर्शनास आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, ही घटना घडून ४८ तास उलटल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात पाचजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी) शहरातील दुसरी घटना दोन वर्षांपूर्वी साताऱ्यातील रविवार पेठेतील सेंट्रल बँकेतून अशाच प्रकारे सहा ते सातजणांनी दिवसाढवळ्या १४ लाखांची रोकड चोरून नेली होती. या प्रकरणातही संबंधित आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसून आले होते.
आयडीबीआय बँकेतून साडेचार लाख लांबविले
By admin | Updated: August 6, 2015 00:40 IST