पांडुरंग भिलारे - वाई -‘आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी’ अशी म्हण आहे. वाईत मात्र ती ‘झळ वस्तीला अन् बंब दुरुस्तीला’ अशी वापरली पाहिजे. शहरातील रंगाच्या गोदामाला रविवारी लागलेल्या आगीच्या वेळी पालिकेचा बंब दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये होता, हे समोर आल्याने वाईकर संतप्त झाले आहेत. शहराचा विस्तार वाढत असताना अग्निशमन दलासारखी आपत्कालीन यंत्रणा सुस्थितीत नसल्याने तसेच पर्यायी व्यवस्थाही दूर असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून आगीशी झुंज द्यावी लागली, यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाई येथील पंचायत समितीशेजारील राहुल टायरच्या शेजारी असलेल्या रंगाच्या गोदामाला रविवारी सायंकाळी आग लागली, तेव्हा बंब वेळेत मिळाला नाही, हेच नुकसान वाढण्याचे कारण ठरले. चारच दिवसांपूर्वी शिरवळमध्ये लागलेल्या आगीच्या वेळीही हेच कारण पुढे आले होते. वाई येथे लागलेल्या आगीत राजेंद्र मांढरे यांच्या दुकानातील मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नागरिकांनी पालिकेशी आगीच्या बंबासाठी संपर्क साधला असता बंब नादुरुस्त असल्याने तो घटनास्थळी येऊ शकत नाही, असे उत्तर मिळाले. त्यामुळे वाईकर नागरिकांमध्ये पालिकेविरोधात संतापाची लाट उसळली. शेकडो तरुणांनी बादल्या आणि बॅरलच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. अनेकांनी जीवही धोक्यात घातला. शेजारीच असणाऱ्या टायरच्या दुकानातील लाखो रुपयांचा माल तरुणांनी भराभर बाहेर काढून वाचविला. आग लागल्यानंतर तासाभराने किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या बंबाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझविली. त्यानंतर पाचगणी, महाबळेश्वरचे बंब घटनास्थळी आले. या सर्व घटनाक्रमातून निमशहरी भागात आपत्कालीन व्यवस्थापन या विषयाकडे कितपत गांभीर्याने पाहिले जाते, हे पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. वाई शहराचा पसारा मोठा आहे. अनेक जुने वाडे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. शहरापासून जवळच मांढरदेव हे देवस्थान आहे. वाईतील नागरीकरण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक अग्निशमन दलाची गरज आहे, असे नागरिकांनी बोलून दाखविले. (प्रतिनिधी)शहराची सुरक्षा रामभरोसेआग लागल्यानंतर अनेकांनी अग्निशमन दलाच्या बंबासाठी नगरपालिकेशी संपर्क साधला होता. पालिका प्रशासनाने असमर्थता दर्शविल्यामुळे शहरात कोणत्याही भागात अचानक आग लागल्यास बाहेरून बंब मागवायला लागणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सध्या तरी पालिकेचा बंब उपलब्ध नसल्याने शहराची सुरक्षा रामभरोसे आहे.सध्याचा अग्निशमन बंब दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आहे. येत्या तीन-चार दिवसांत तो दुरुस्त होऊन तयार होईल. आम्ही नवीन अत्याधुनिक बंबाचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला होता; पण तो नामंजूर झाला. तरीसुद्धा न थांबता पालिकेच्या घसारा निधीतून लवकरच नवीन, जास्त क्षमतेचा अत्याधुनिक बंब खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. - भूषण गायकवाड, नगराध्यक्ष, वाईआम्ही अग्निशमन दलाच्या बंबाच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाला माहिती दिली. त्यानुसार बंबाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.- नारायण गोसावी, अग्निशमन विभागप्रमुख,वाई पालिकाआग लागल्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब लवकर घटनास्थळी दाखल झाला असता तर एवढे नुकसान झाले नसते. पालिकेने अत्याधुनिक बंबाची व्यवस्था करावी.- राजेंद्र मांढरे, नुकसानग्रस्त व्यावसायिक
झळ बसली वस्तीला अन् बंब गेला दुरुस्तीला!
By admin | Updated: December 29, 2014 23:54 IST