कऱ्हाड : जिल्हा बँकेचे संचालकपद हे प्रत्येक राजकारण्याला प्रतिष्ठेचे वाटते. आमदार, खासदार, मंत्रीही यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसतात. सातारा जिल्हा बँकेत मात्र कऱ्हाड उत्तरला गेली ४५ वर्षे प्रतिनिधित्वच नाही. स्वीकृत संचालकपद देत अधून-मधून तहान भागवली जाते एवढेच. यंदा मात्र ‘मागच्या नव्हे, पुढच्या दारानेच बँकेत जायचं’ असा इरादा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा आहे. त्यामुळे सोसायटी मतदारसंघातील मतदारांशी त्यांचा पत्रव्यवहार सुरू असून, त्यांनी अप्रत्यक्षपणे आपली उमेदवारीच जाहीर केल्याचे बोलले जात आहे.
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित आहे. या निवडणुकीत कऱ्हाड तालुका नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतो. यंदा या तालुक्यातून कृषीविषयक विकास सेवा संस्था (सोसायटी) मतदारसंघातून सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील उतरण्याचे संकेत मिळत आहेत. या मतदारसंघातून ते प्रथमच नशीब अजमावतील, अशी स्थिती आहे.
गत वर्षभरापासूनच सोसायटी मतदारसंघाचा मंत्री पाटील यांनी अभ्यास चालविला आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून त्यांनी संबंधित मतदारसंघातील मतदारांशी संपर्क वाढवला आहे. नुकतेच या मतदारांपर्यंत मंत्री बाळासाहेब पाटील यांचे एक पत्रही पोहोचले असून, निवडणुकीत मदत करण्याचे भावनिक आव्हान त्यात करण्यात आले आहे.
सातारा जिल्हा बँकेवर माजी मंत्री विलासराव पाटील यांचे प्रदीर्घ काळ वर्चस्व राहिले होते. त्यांच्या काळात बँकेने नाबार्डचे अनेक पुरस्कारही मिळवले. १९६७ ते २०२१ पर्यंत त्यांनी सोसायटी मतदारसंघातून कऱ्हाडचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनामुळे या मतदारसंघातून त्यांचे वारसदार ॲड. उदयसिंह पाटील दावा करीत आहेत.
सोसायटी मतदारसंघातून काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील निवडणूक तयारीत असतानाच मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याही जोर-बैठका सुरू आहेत. त्यामुळे या दोघांच्यात प्रत्यक्ष निवडणूक झाली, तर काटे की टक्कर होईल, असे राजकीय जाणकार सांगतात. कऱ्हाड तालुक्यात दक्षिण व उत्तर असे दोन विधानसभा मतदारसंघ असल्याने उत्तरला संधी कधी? असा सवाल मंत्री पाटील समर्थक करीत आहेत.
सध्या जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. ही निवडणूक सर्वांना बरोबर घेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहील, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सूतोवाच केले आहे. मात्र, पालकमंत्री असणाऱ्या कऱ्हाड तालुक्यातील पेच कसा सोडविला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
सलग पाचवेळा आमदार; पण ...
जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे १९९९ पासून कऱ्हाड उत्तरमधून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, जिल्हा बँकेच्या राजकारणापासून ते बरेच दूर राहिले गेले. त्यांना संधी मिळालीच नाही. निवडणूक लढवूनही यशापर्यंत पोहोचले नाहीत. त्यांना स्वीकृत संचालक करण्यात आले खरे; पण त्यावर ते समाधानी नाहीत, हेच नक्की.
फोटो
मंत्री बाबासाहेब पाटील