सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वे येथील शालन भास्कर थोरात यांच्या वस्तीवरील घरात जालिंदर ऊर्फ मामा वायदंडे हा लक्ष्मी ऊर्फ रामव्वा हणमंत साळुंखे (मूळ रा. भिलवडी, ता. पलूस, जि. सांगली) हिच्यासोबत पत्नी असल्याचे सांगून राहत होता. जालिंदर हा लक्ष्मीवर चारित्र्याच्या कारणावरून संशय घेत होता. त्या कारणावरून त्यांच्यात वादही होत होते. १६ जून २०१६ रोजी रात्री त्याने याच कारणावरून कुऱ्हाडीचा तुंबा डोक्यात घालून लक्ष्मीचा खून केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन आरोपी जालिंदर वायदंडे याला ताब्यात घेऊन अटक केली. कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला. तपासानंतर ३१ ऑगस्ट २०१६ रोजी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्या. औटी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने त्यांनी बारा साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी शालन थोरात, साक्षीदार इराप्पा तेलगाणी, संजय थोरात, तपासी अधिकारी सहायक निरीक्षक विवेक पाटील, वैद्यकीय अधिकारी सुरेश पवार व हवालदार सुभाष फडतरे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी जालिंदर ऊर्फ मामा वायदंडे याला त्याच्या पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
- चौकट
मंगळसूत्र काढून खिशात ठेवले
पत्नी लक्ष्मी ऊर्फ रामव्वा हिचा खून केल्यानंतर आरोपी जालिंदर याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून आपल्या खिशात ठेवले होते. तसेच रात्रभर तो मृतदेहाशेजारीच बसून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस पोहोचले त्यावेळी रक्ताने माखलेली कपडे आणि हातातील कुऱ्हाडीसह आरोपी जालिंदरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, असे सरकारी वकील अॅड. शहा यांनी सांगितले.
- चौकट
लक्ष्मीने फोन केला; पण...
पती जालिंदर हा आपला खून करण्याच्या विचारात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर लक्ष्मी हिने मध्यरात्री तीन वाजता तिच्या माहेरकडील ओळखीच्या इराप्पा तेलगाणी यांना फोन केला होता. मात्र, ते झोपले असल्यामुळे त्यांनी तिचा फोन उचलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी लक्ष्मीचा मिस्ड कॉल पाहिल्यानंतर तिला कॉल केला. मात्र, लक्ष्मीऐवजी तो कॉल जालिंदरने उचलला होता. हे कॉल रेकॉर्ड महत्त्वाचा पुरावा ठरला, असे अॅड. शहा यांनी सांगितले.