सातारा : प्रदूषणाबाबत नागरिकांत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलींचा वापर करून प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा, या उद्देशाने ‘सायकल क्रांती’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. या रॅलीला साताराकरांमधून उत्स्फूर्त सहभाग मिळत असून, शेकडो पर्यावरणप्रेमींनी नोंदणी केली आहे.‘लोकमत बालविकास मंच, युवा नेक्स्ट’ हे याचे माध्यम प्रायोजक आहे. अमर सायकल एजन्सी व फायरफॉक्स बाईक्स स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ आॅगस्ट रोजी ‘सायकल क्रांती’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यदिनी स्पर्धात्मक सायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही पूर्णपणे मोफत असून, सर्वांसाठी खुली आहे. १५ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता तालीम संघापासून रॅलीला सुरुवात होईल. यानंतर राजवाडामार्गे कर्मवीर भाऊराव पाटील पथावरून (खालचा रस्ता) शनिवार चौक, शेटे चौक, पोवई नाका, एसटी स्टँडपर्यंत जाऊन पुन्हा पोवई नाका, शाहू चौकमार्गे तालीम संघावर रॅली पूर्ण होईल. रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी स्वत:ची सायकल आणणे आवश्यक आहे.यावेळी आकर्षक बक्षीस देण्यात येणार असल्याची माहितीही जेजुरीकर यांनी दिली. यावेळी नैतिक क्रिएटर्सच्या रश्मी साळवी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
‘सायकल क्रांती’साठी शेकडो सातारकरांचा उत्स्फूर्त सहभाग
By admin | Updated: August 11, 2014 22:05 IST