रहिमतपूर : ‘वजनकाटा, रिकव्हरी, मळी, बगॅस या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशात भ्रष्टाचार करणाऱ्या सह्याद्रीच्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना परिवर्तन घडवून त्यांची जागा दाखवून द्या,’ असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले. तर कारखान्यावर आलेल्या उसात काटामारी करणाऱ्यांचा कारभार पारदर्शक कसा? असा सवाल करीत कारखान्याच्या चुकीच्या वजनाच्या काही पावत्याच काँग्रेसचे धैर्यशिल कदम यांनी सादर केल्या. रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे यशवंतराव चव्हाण शेतकरी सह्याद्री पॅनेलच्या सांगता सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मानसिंगराव माने होते. सह्याद्री प्रतिष्ठानचे लालासाहेब यादव, कऱ्हाड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, स्वाभिमानीचे मनोज घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती भीमराव पाटील, एम. जी. थोरात, संपतराव इंगवले, वसंतराव जगदाळे, हिंदूराव चव्हाण, भीमराव घोरपडे, शिवसेनेचे रामभाऊ रैनाक, सुनील भोसले, अजित जगताप आदी उपस्थित होते.सदाभाऊ म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लुटारू कारखानदारीविरोधात लढा उभारल्यानेच ऊस उत्पादक सभासदांच्या घामाला योग्य दाम मिळू लागला आहे. सह्याद्रीत भ्रष्ट कारभाराच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी सहकार चळवळीची वाट लावली आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कृपेमुळे तुम्ही आहात. तुमचे कर्तृत्व काय असा सवालही त्यांनी केला.’ (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका...धैर्यशिल कदम म्हणाले, ‘गेली ४० वर्षे सर्व सत्तास्थाने एकाच घरात दिसत आहेत. सह्याद्री कारखाना तर सत्ताधाऱ्यांनी राजकारणाचा अड्डा केला आहे. हे सर्व किती दिवस चालणार? म्हणून तर शेतकरी सभासदांच्या आग्रहास्तव आपण रिंंगणात उतरलो आहोत. मग कुठे आता सत्ताधाऱ्यांना कारखान्याचे दुसरे युनिट काढण्याचे शहाणपण सुचू लागले आहे. साखर संघाचे अध्यक्षपद भोगले, अनेक वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भोगत आहात. मग यापूर्वी दुसरे युनिट काढायला तुमचे हात कुणी बांधले होते का ? दुसरे युनिट काढण्यासाठी तांत्रिक अडचणी येतात त्याचं काय करणार हे जाहीर करा. उगाच शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका.
काटामारी पारदर्शी कशी ?
By admin | Updated: March 16, 2015 23:38 IST