दहिवडी : ‘गेल्या दोन-तीन वर्षांपासून मतदारसंघातील वातावरण गढूळ करण्याचे काम काही विरोधक करीत आहेत. ज्यांना रस्ता, पाणी, वीज समस्या माहीत नाहीत. ज्यांना पक्ष, पार्टी नाही, अशा विरोधकांना जनतेचा कळवळा असणे शक्यच नाही. माझा फोटो वापरून निवडून येऊन माझ्याशी, कुटुंबाशी गद्दारी करणारे जनतेबरोबर कसे राहणार?,’ असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी बंधू शेखर गोरे यांचा उल्लेख न करता लगावला. दरम्यान, यावेळी त्यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले विरोधक उगाचाच अकांडतांडव करीत आहेत. माजलेल्या रावणाची लंका एका वानराने पेटविली होती, हेही विसरू नये, असा सल्लाही दिला.स्वरूपखानवाडी, ता. माण येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती अॅड. भास्करराव गुंडगे, बाजार समितीचे सभापती अरुण गोरे, दादासाहेब काळे, चांगदेव सूर्यवंशी, सरपंच काकासाहेब माने, तानाजी जायकर, पोपट रोमन, सुरेश जाधव, बापूराव आवळे, आनंदराव इंदलकर, दादा कदम, शिवाजी कुंभार, नितीन कदम, लक्ष्मण जाधव, शामराव गलंडे, दादासाहेब इंगळे, रूपाली आवळे, राजाराम बरकडे, गुलाब पिसाळ आदी उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, ‘सत्ता मिळाली म्हणून उन्माद करायचा नसतो. जय-पराजय पचवायची ताकद असावी लागते. गेल्या सात-आठ वर्षांत माझ्या विरोधात अनेक आले आणि गेले. मात्र, मी आहे तिथेच आहे.’ (प्रतिनिधी)बारामतीकरांचा विरोध डावलून निवडणूक जिंकली...जनतेच्या विश्वासावर विधानसभेसह फलटण, बारामतीकरांचा विरोध डावलून जिल्हा बँकेची निवडणूक जिंकण्यातही आम्हाला यश आले आहे. फेडरेशन, बाजार समितीही ताब्यात आली आहे, असेही गोरे यांनी सांगितले.
कुटुंबाशी गद्दारी करणारे जनतेबरोबर कसे राहणार?
By admin | Updated: October 13, 2015 00:08 IST