सातारा : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना ईएसआयसीचा लाभ मिळत असतानाही जिल्हा रुग्णालय आणि ईएसआयसीमधील घोळात रुग्णाला उपचाराविना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच नुकतीच एक घटना घडली असून, संबंधित कामगाराने ‘लोकमत’कडे आपली कैफियत मांडून दोन्ही रुग्णालयांतील अन्यायाचा पाढाच वाचला. याबाबत माहिती अशी की, लावंघर, ता. सातारा येथील सूर्यकांत महादेव गुरव हे येथील औद्योगिक वसाहातीतील एका कंपनीत कामाला आहेत. दर महिन्याला त्यांच्या पगारातून ठराविक रक्कम ईएसआयसी योजनेसाठी कापून घेतली जाते. त्यामधून त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना ईएसआयसी रुग्णालय व योजनेचा लाभ घेता येतो. गुरव यांना गुडघ्याचा त्रास होऊ लागल्यामुळे ते येथील इएसआयसीच्या रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांना केस पेपरवर लिहून जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी गुरव हे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेले. त्याठिकाणी शिकाऊ डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून एक्स-रे काढण्यास सांगितला. गुरव हे एक्स-रे काढण्यासाठी संबंधित ठिकाणी गेले; पण त्यांना ‘३० रुपये फी भरा तरच एक्स-रे काढू,’ असे सांगण्यात आले. गुरव यांनी स्पष्ट शब्दात पैसे भरण्यास नकार दिला. ‘इएसआयसीसाठी पैसे कापून घेत असताना एक्स-रेची फी मी का भरायची?, कामगारांना सर्व वैद्यकीय सेवा मोफत आहे,’ असेही त्यांनी सांगितले. एवढे सर्व झाल्यानंतर गुरव पुन्हा इएसआयसीच्या रुग्णालयात आले. त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा रुग्णालयातील सर्व कहाणी सांगितली. ‘कामगारांना आरोग्यसेवा मोफत असताना मी पैसे भरणार नाही,’ असेही ते म्हणाले. त्यानंतर इएसआयसीच्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केस पेपरवर लिहून गुरव यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले. तरीही गुरव यांचा एक्स-रे काढला नाहीच. त्यामुळे गुरव यांनी या सर्व गोष्टींची कैफियत ‘लोकमत’ जवळ मांडली. (प्रतिनिधी)गुडघ्यावर उपचार करण्यासाठी मी ईएसआयसी आणि जिल्हा रुग्णालय असे तीन हेलपाटे मारले आहेत. आरोग्यसेवा मोफत असताना मी पैसे का भरायचे, हा माझा प्रश्न आहे. कामगारांवरील होणारा अन्याय दूर करण्याची गरज आहे.- सूर्यकांत गुरव, कामगार लक्ष देत नाहीत...जिल्हा रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले की, आम्ही ईएसआयसीकडे तीन-चार वर्षांपासून संबंधित अडचणीविषयी पाठपुरावा करत आहोत. पण, याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे एक्स-रेची फी भरण्यास सांगण्यात आले होते.
उपचारासाठी रुग्णालय, इएसआयसीकडे हेलपाटे!
By admin | Updated: June 10, 2015 00:31 IST