शहरासह तालुक्यात कोरोना संसर्ग उग्र स्वरूप धारण करीत आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार व्यापारी, विक्रेत्यांना सूचना दिल्या जात आहेत. मात्र, तरीही काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगसह इतर सूचनांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येते. शनिवारी दुपारी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी.आर. पाटील हे मुख्य बाजारपेठेतून जास्त असताना, त्यांना एका कापड दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दुकानात पाचपेक्षा जास्त जणांना प्रवेश देण्यास मनाई आहे. असे असतानाही संबंधित दुकानात गर्दी असल्यामुळे निरीक्षक पाटील यांनी पालिकेच्या पथकाला बोलावून संबंधित दुकान मालकास तीन हजारांचा दंड केला, तसेच सात दिवसांसाठी दुकान सील केले. अन्य सात दुकानांवरही पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने अशीच धडक कारवाई केली. शहरातील एकूण आठ दुकाने सील करण्यात आली असून, प्रत्येकी तीन हजारांप्रमाणे एकूण २४ हजारांचा दंडही दुकानदारांना करण्यात आला आहे. या कारवाईने इतर व्यापारी व विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
- चौकट
ध्वनिक्षेपकावरून पोलिसांचे आवाहन
सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्या इतर नियमांबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नियम न पाळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी सूचना पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे शहरातील मुख्य बाजारपेठेत करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
- कोट
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळता दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांची गर्दी केल्यास संबंधित दुकानांवर यापुढेही कारवाईची मोहीम सुरूच ठेवली जाणार आहे. व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- बी. आर. पाटील,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
फोटो : ०३केआरडी०६
कॅप्शन : कऱ्हाडातील मुख्य बाजारपेठेत कारवाई करून पोलिसांनी कापड दुकान सात दिवसांसाठी सील केले.