मसूर : निगडी (ता. कऱ्हाड) येथील ऐतिहासिक ठेवा असलेल्या बारव विहीर परिसराची तरुणांनी ऊन्हाची तमा न बाळगता दिवसभर राबून डागडुजी केली. या परिसराची स्वच्छता केल्याने बारव विहीर परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
निगडी गावात २००३ व २००७ साली भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी ज्या बारव विहिरीने गावाला पाणी देऊन तारले होते, ती विहीर चारीबाजूंनी झाडाझुडपांनी वेढल्याने दिसेनाशी झाली होती. तिची तातडीने स्वच्छता करण्याचा निर्णय घेत काही युवकांनी या कामासाठी पुढाकार घेतला. युवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भीमराव घोलप, दादासाहेब कदम, अमर चव्हाण, विजय माने, बापूसाहेब माने, संदीप सुतार, सुजित कुंभार आदी युवक बारव विहिरीजवळ जमले. अन्य काहींच्या मदतीने हे विधायक काम हाती घेत उन्हातान्हाची तमा न बाळगता केवळ तीन-चार तासातच बारव विहीर परिसराची स्वच्छता करून परिसर चकाचक केला.
कित्येक वर्षांनी बारव परिसराने मोकळा श्वास घेतल्याचा आनंद युवकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या कामाबद्दल सर्व युवकांचा सुनील कुंभार यांच्याकडून गौरव करण्यात आला. सध्या या बारव विहीर परिसरात महिलांसह वृद्ध ग्रामस्थ जनावरांना पाणी पाजण्यासाठी व महिला धुणे धुण्यासाठी येतात.
- कोट
निगडी गावात इतिहासाची साक्ष देत दिमाखात असलेली बारव विहीर म्हणजे गावाचे वैभव आहे. ही बारव नंदी आकाराची आहे. या ऐतिहासिक ठेव्याचे महत्त्व पुढील पिढीला कळावे आणि दुष्काळी स्थितीत येथील पाण्याचा उपयोग व्हावा, यासाठी तरुणांच्या सहकार्याने त्याची कायमस्वरूपी देखभाल ठेवण्याचा प्रयत्न राहील.
- सुनील कुंभार
सामाजिक कार्यकर्ते, निगडी
फोटो : ०५केआरडी०१
कॅप्शन : निगडी (ता. कऱ्हाड) येथे युवकांनी स्वच्छता केल्यामुळे ऐतिहासिक बारव विहिरीने मोकळा श्वास घेतला. (छाया : जगन्नाथ कुंभार)