सातारा : जिल्हा परिषदेचे पुरवणी अंदाजपत्रक ३१ कोटींचे जाहीर करण्यात आले, तर मूळ व पुरवणी मिळून ७१ कोटी ९९ लाखांचे हे अंदाजपत्रक राहिले. दरम्यान, याच सभेत हायमास्ट दिव्यांचा निधी यशवंत घरकुलांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच लोकल बोर्डच्या जुन्या इमारतीतील उपाहारगृहाच्या भाडेमाफीच्या विषयावरही जोरदार चर्चा घडून आली.
जिल्हा परिषदच्या या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये समाज कल्याण विभागाकडील हायमास्ट दिव्यांचा निधी यशवंत घरकूल योजनेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वच सदस्यांनी स्वागत केले. कारण, हायमास्ट दिव्यांसाठी वीज अधिक जळते. त्यामुळे ग्रामपंचायतींना वीजबिल जादा प्रमाणात भरावे लागेल. या दृष्टिकोनातून हायमास्टचा विषय थांबविण्यात आला.
जिल्हा परिषदच्या लोकल बोर्डच्या जुन्या इमारतीतील उपाहारगृह कोरोनाकाळात बंद असल्याने भाडेमाफ करण्याचा विषय मांडण्यात आला. यावर मानकुमरे यांनी उपाहारगृह वशिल्यावाल्यांचे आहे, परवडत नसेल तर खाली करावे. जिल्हा परिषदचे नुकसान कशासाठी, असा सवालही त्यांनी केला. यावर दीपक पवार यांनी भाडे किती, असा प्रश्न केला. त्याचबरोबर या सभेत मुद्रणालयातील नियुक्तीचा विषयही पटलावर आला. यावरून सदस्य मानकुमरे आणि राजेश पवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. कोरोनाकाळात आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी काही सदस्यांनी केली. गरूडझेप कंत्राटदाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. उपाध्यक्षांनी त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधिताला काळ्या यादीत टाकावे, असे सदस्यांनी सांगितले.
.............................................................