कातरखटाव : खटाव तालुक्याच्या पूर्वेकडील पडळ, कणसेवाडी, एनकूळ या भागात मंगळवारी रात्री ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडविला. सायंकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसाने पडळ येथील ओढ्याला पूर आला तर एनकूळ येथील फरशीपूल खचला. या भागात गेल्या सत्तर वर्षांत अशा प्रकारचा पाऊस कधीच पाहिला नव्हता, अशी माहिती पडळ येथील ज्येष्ठ नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. खटावच्या पूर्व भागातील ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेने हैराण झाले आहेत. आकाशात काळे ढग जमा होतात; मात्र पाऊस पडत नाही. असे चित्र अनेक दिवसांपासून दिसत आहे. मात्र, मंगळवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. सात ते साडेनऊ या कालावधीत पडळ, एनकूळ, कणसेवाडी, पळसगाव व डोंगर माथ्यावरील आगासवाडी परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसाने एनकूळ गावतील फरशी पूल खचला. तसेच पडळ येथील ओढ्याला पूर आल्याने दुधाची वाहतूक करणारा छोटा हत्ती (टमटम) सुमारे पंधराशे फूट लांब वाहून गेला. कणसेवाडी येथील १९७२ च्या काळातील पाझर तलाव गेल्या पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे.मात्र, या बंधाऱ्याला गळती लागल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी किती दिवस टिकून राहणार? असा प्रश्न कणसेवाडी, एनकूळ येथील शेतकऱ्यांपुढे पडला आहे. दरम्यान, या पावसामुळे पूर्व भागात कुठेही घरांची पडझड अथवा मोठे नुकसान झाले नाही. मात्र, प्रचंड प्रमाणात झालेल्या या पावसामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या सत्तर वर्षांत एवढा मोठा पाऊस कधीच पाहीला नाही, अशी प्रतिक्रया पडळमधील ज्येष्ठ नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर) दोन तासांत ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस पडळमध्ये झाला. ओढ्याचे पात्र सोडून दीडशे फूट लांब पाण्याचा फुगवटा होता. वाहून गेलेल्या टमटममधील तीन युवकांना वाचविण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. - चंद्रकांत सानप, माजी सरपंच, पडळ कणसेवाडीचा तलाव पूर्ण भरून वाहत असल्यामुळे श्ोतकरी समाधानी आहे. पंरतु गळती काढली नाही तर तलावामध्ये पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहणार नाही. शासनाने या तलावाची तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. - धनाजी लवळे माजी उपसरपंच, कणसेवाडी ग्रामस्थांनी वाचविले तिघांचे प्राण मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दुधाची वाहतूक करणारा छोटा हत्ती (टमटम) पडळ येथील ओढ्याला आलेल्या पुरात वाहत गेला. या टमटममध्ये बाबूराव जाधव (वय १८), सौरभ हानगे (१७) व अचुतकुमार मालेव (२९) हे तिघेही वाहून गेले. पाण्याला ओढ असल्यामुळे टमटम सुमारे पंधाराशे फूट लांब वाहत गेला. तिघांपैकी एक मुलगा झाडामध्ये अडकला होता. ग्रामस्थांनी रात्री ११.३० वाजेपर्यंत मदतकार्य करून सोल व दोरखंडाच्या साह्याने तिघांनाही पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.
ढगफुटीसदृश पावसाने दुष्काळी भागात दाणादाण
By admin | Updated: June 11, 2015 00:26 IST