सातारा : जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत कार्यरत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील अनेक वर्षांपासून सेवेत असणाऱ्या २९ आरोग्य सेविकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. कंत्राटी कोरोना योद्ध्यांनंतर या सेविकांना काढण्यात आल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर आणखी ताण वाढणार आहे.
मागील सुमारे १५ वर्षांपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू आहे. हे अभियान विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सुरू करण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण व परिणामकारक आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात पोहोचविण्याचे ध्येय होते. तसेच अर्भक मृत्युदर आणि माता मृत्युदर कमी करणे, सर्व लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याबाबत उपाययोजना आखणे, जननदर कमी करणे, आदी कामे करण्यात येणार होती.
दरम्यान, कोरोना काळात आरोग्य विभागात घेतलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्ट रोजी सेवामुक्त करण्यात आले. त्यानंतर १५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या २९ आरोग्य सेविकांनाही कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या या सेविकांना कार्यमुक्त केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संघटनेने निवेदन दिले आहे. त्यामध्ये सेवेतून मुक्त केलेल्या सेविकांना कामावर न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
...........