सातारा : शहरातील एका मेडिकलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ६१ वर्षीय वृद्धावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजू पटेल असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मेडिकलमधील आतील खोलीत चौदावर्षीय मुलीला दि. २५ रोजी दुपारी २ च्या सुमारास राजू पटेल (वय ६१, रा. बिलाल मशिदीजवळ, श्रीपतराव हॉस्पिटल पाठीमागे, करंजे, सातारा) आणि एका अनोळखी व्यक्तीने हाताला ओढून नेले. याने तिच्याशी अश्लील चाळे केले. यावेळी सोबत असणाऱ्या अनोळखी व्यक्तीला त्याने चाळे करत असतानाचे फोटोही काढण्यास सांगितले. याची माहिती मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत या दोघांनाही अटक करण्यात आली नव्हती. पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे अधिक तपास करत आहेत.