वरकुटे मलवडी : वरकुटे मलवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाची निवड प्रचंड गोंधळ आणि हमरीतुमरीत पार पडली. विशेष म्हणजे, तीनवेळा तहकूब होऊन पुन्हा झालेल्या या बैठकीला गटशिक्षणाधिकारी यांना यावे लागले. त्यांनाही घेराव घालण्यात आला. पाच तास हजर राहिल्यानंतर कुठे अध्यक्षपदाची ही निवड झाली. वरकुटे मलवडी, ता. माण येथील शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपद निवडीसाठी बैठक झाली. त्यासाठी माणचे गटशिक्षणाधिकारी वामनराव जगदाळे हे स्वत: आले होते. येथील प्रभारी मुख्याध्यापिका शकुंतला पवार यांची तडकाफडकी बदली करा. तसेच शाळेत शांतता व सुव्यवस्थितपणा यावा, यासाठी ग्रामस्थांनी आपल्या भावना आक्रमकपणे गटशिक्षणाधिकाऱ्यांपुढे मांडल्या. शाळेच्या इमारतीबद्दल मुख्याध्यापिकांनी दुर्लक्ष केले आहे, अशा तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. अगोदर शाळेची इमारत दुरुस्त करा नंतर शाळा व्यवस्थापन समिती तयार करा, असा आग्रहही ग्रामस्थांनी धरला. गटशिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, नियमानुसार हे काम होईल, असे सांगून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी गोंधळातच समितीची निवड केली. केंद्रप्रमुख इन्नूस इनामदार, अंकुश शिंदे, डॉ. रूपनवर, संजय चव्हाण, बाळकृष्ण सोनवणे, अरुण जगताप, रमेश कुंभार, दत्ता चव्हाण, विशाल पिसे, कैलास बनसोडे, प्रदीप पन्हाळे, धनाजी काळेल, पिंटू पिसे, नवनाथ मिसाळ, सचिन जगताप, सारिका पिसे, सुरेखा पिसे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)तीनवेळा बैठक अन् अध्यक्षपदी राजाराम बनसोडे...शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी तब्बल तीनवेळा बैठक झाली. प्रत्येकवेळी गोंधळ झाला. त्यामुळे ही निवड तहकूब करावी लागली. शेवटी गटशिक्षणाधिकाऱ्यांना यावे लागले. तरीही गोंधळ उडालाच. या गोंधळातच समितीच्या अध्यक्षपदी राजाराम मारुती बनसोडे यांची निवड करण्यात आली.
वरकुटे मलवडीच्या शाळेत गोंधळ, हमरीतुमरी
By admin | Updated: January 2, 2015 23:59 IST