वेळे : वेळे (ता. वाई) येथे कृषी महाविद्यालय, फलटण येथील सातव्या सत्रातील कृषिकन्या अविशा विजय पवार हिने शेतकऱ्यांना चारानिर्मिती प्रकल्प व सिंचनाचे महत्त्व याबाबत बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांसाठी दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करून ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन कसे करावे, तसेच ठिबक सिंचन वापरताना जमिनीचा दर्जा, पिकाची जात, पिकाचे स्वरूप, बाष्पीभवनाचा वेग, हवामान आदी बाबी विचारात घेऊन ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन कसे करावे याबाबत प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. सिंचनाचे फायदे व घ्यावयाची काळजी याबाबतदेखील सखोल मार्गदर्शन केले.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नवीन चाराप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये सुका चारा प्रक्रिया, मूरघास, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान याविषयी माहिती देण्यात आली व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
याबाबत अविशा पवार या कृषिकन्येला कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. ढालपे, कार्यक्रम अधिकारी डॉ. गायकवाड, प्रा.नगरे, प्रा. लाळगे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रात्यक्षिकावेळी वेळे गावच्या ग्रामपंचायत सदस्या शीतल पवार, विजय पवार, सुरेश पवार, रेश्मा पवार, अनिता लोंढे, सुनील लोंढे, सर्जेराव पवार, किरण पवार आदी शेतकरी उपस्थित होते.
कोट..
ठिबक सिंचनाचा शास्त्रोक्त पद्धतीने वापर केला, तर पाण्याची बचत होऊन उत्पन्नदेखील वाढेल. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा वापर करून आर्थिक हानी टाळून भरघोस उत्पन्न घ्यावे व वेळेची बचतदेखील करावी.
- शीतल पवार, ग्रामपंचायत सदस्या, वेळे
०२वेळे
कृषिकन्या अविशा पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सिंचन व चारानिर्मितीबाबत मार्गदर्शन केले.