कातरखटाव : कातरखटाव ग्रामपंचायतीची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे पॅनेलवाले मोर्चेबांधणी करीत असून, ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे. भेरवनाथ, कात्रेश्ववर, हनुमान आणि महालक्ष्मी या चारी वाॅर्डात बऱ्याच ठिकाणी दोन्ही पॅनेलच्या आजी-माजी सदस्यांनी ‘और एक बार’ म्हणत दंड थोपटले असून, मातब्बर उमेदवार पुन्हा आपापल्या वाॅर्डात उभे असल्यामुळे मतदारराजा नक्की कुणाला कौल देणार? अशी खुमासदार राजकीय चर्चा परिसरात होऊ लागली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता कंबर कसून कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीचा आढावा घ्यायचा झाला, तर चुरशीच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा राजकारणात उडी घेतलेले उद्योजक तानाजीशेठ बागल यांनी श्री जानाईदेवी ग्रामविकास पॅनेलची स्थापना करून नवख्या उमेदवारांना रिंगणात घेऊन अकरापैकी नऊ उमेदवार निवडून आणून विजय आपल्याकडे खेचून घेतला होता. त्यावेळी प्रतिस्पर्धी अजितराव सिंहासने यांच्या श्री कात्रेश्ववर ग्रामविकास पॅनेलला निसटत्या पराभवाची झळ सोसावी लागली होती.
परंतु आता श्री कात्रेश्ववर ग्रामविकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी ‘हम किसीसे कम नहीं,’ असे म्हणत कंबर कसून तगड्या उमेदवारांची फळी मजबूत करीत अर्ज भरले आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये कातरखटाव गावगाडा विकासकामावर तानाजीशेठ बागल यांनी चांगला जोर लावून धरला होता. गावातील अंतर्गत रस्ते, पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवला, काही ठिकाणी पदरमोड करून वाड्या-वस्त्यांवर विकासकामे केल्याचे दिसून आले. असे असताना माजी सरपंच तानाजीशेठ बागल हे पुन्हा आपले नवीन, जुने मावळे घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरले असून, जनता-जनार्धन मतदारराजा कौल कुठे देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील दोन वर्षांत कातरखटाव विकास सोसायटीमध्ये कार्यकर्ते फोडाफोडीचे राजकारण चांगलेच तापले गेले. त्यावरून कात्रेश्ववर ग्रामविकास पॅनेलचे अजितराव सिंहासने आणि सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्यात नाराजी निर्माण झाल्यामुळे यामध्ये दोन गट पडले गेले व तानाजीशेठ बागल आणि बाळासाहेब पाटील यांची युती झाली. त्यामुळे आता या रणधुमाळीत पारडं नक्की कोणतं जड जाणार, हे येणारा काळ ठरवणार आहे.
चौकट..
काही ठिकाणी नाराजी.. दुसरीकडे चुरस...
काही ठिकाणी ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र दिसत आहे. नेहमी एकमेकांबरोबर राहणारे काही कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये विरोधक ‘लोहा गरम है, मार दो हतोडा..’ याप्रमाणे अनोखी शक्कल लढवत कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करून विरोधकांना कडवी झुंज देण्यासाठी सज्ज झाले आहेत.