सातारा : ‘सातारा शहरातील वाहतुकीची अनेक वर्षांची समस्या ग्रेड सेपरेटरमुळे सुटली आहे. त्याचबरोबर या सेपरेटरमुळे शहाराच्या वैभवात भर पडली आहे,’ असे प्रतिपादन राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
येथील पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती रामराजेंच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अधीक्षक अभियंता एस. जी. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे, सुनील माने आदी उपस्थित होते.
सातारा शहरात नवीन नागरी सुविधा ग्रेड सेपरेटरच्या माध्यमातून मिळाली आहे. पोलीस विभागाच्या माध्यमातून ग्रेड सेपरेटरमध्ये लोकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी सूचना यावेळी रामराजेंनी केली.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यातूनच ग्रेड सेपरेटरची संकल्पना पुढे आली. केंद्राने ६० व राज्य शासनाने १६ कोटी रुपये दिले आहेत. या ग्रेडसेपरेटरचे काम चांगल्या पद्धतीने झाले असून, देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना सातारा नगर परिषदेला दिल्या आहेत. ग्रेडसेपरेटरमध्ये सुरक्षिततेदृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यामुळे आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल.’
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मुंबईनंतर मोठे ग्रेडसेपरेटरचे काम आपल्या सातारा शहरात झाले, ही आपल्यादृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. या ग्रेड सेपरेटरची देखभाल, आतील सुरक्षेच्यादृष्टीने काम केले पाहिजे. ग्रेड सेपरेटरमुळे शहरातील गर्दी टाळण्यास मोठा उपयोग झाला आहे.’
ग्रेड सेपरेटरमधून जाताना वाहतुकीचे नियम पाळावेत. तसेच ग्रेड सेपरेटरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली.
या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, संस्थांचे पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्याा संख्येने उपस्थित होते.
चौकट :
उदयनराजेंचा धक्का...
सुमारे ७५ कोटी रुपये खर्चाच्या ग्रेड सेपरेटरचे काम मागील महिन्यातच पूर्ण झाले होते. त्यामुळे उद्घाटन केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी करण्यास गेल्यानंतर उद्घाटन केले. तसेच वाहतूकही सुरू झाली. त्यावेळी उदयनराजेंनी मला धक्के देण्याची सवय आहे, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर शुक्रवारी या ग्रेड सेपरेटरचे शासकीय उद्घाटन झाले.
फोटो २९सातारा ग्रेड सेपरेटर
सातारा येथे शुक्रवारी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. (छाया : जावेद खान)