सागर गुजर - सातारा अजिंक्यतारा किल्ल्यावर झालेल्या जलसंधारणाच्या कामांचा ठसठशीत पुरावा किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या गोडोली व शाहूनगरच्या शिवारात पाहायला मिळतो आहे. ज्याठिकाणी बोअरवेल मारायचा विचार केला तरी पाचावर धारण बसायची, त्या परिसरात आज बोअरवेल व विहिरीचे पाणी खळाळून वाहताना पाहायला मिळत आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर खोल सलग समतल चर, दगडी बंधारे तसेच नाला बंडिंगची कामे झाली. गेल्या दोन वर्षांप सातत्याने सुरु असलेल्या या कामांमुळे किल्ल्यावरील ऐतिहासिक तळी व विहिरीचे पाणी अजूनही काठोकाठ साठून आहे. किल्ल्यावर पूर्वीसारखी शेती केली जात नसली तरी याठिकाणी असणाऱ्या सव्वाशे एकरावर औषधी व फळझाडांची मोठी लागवड झालेली आहे. याचा फायदा भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर झालेला पाहायला मिळणार आहे. मात्र, या कामाने सातारकरांना काय लाभ झाला? हे मांडणेही तितकेच आवश्यक होते. ‘लोकमत’ ने या संदर्भात गोडोली व शाहूनगर मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. गोडोली व शाहूनगर परिसरात काही प्रमाणात शेती केली जाते. याठिकाणी उन्हाळ्या व्यतिरिक्त इतर वेळी बोअरवेल व विहिरीच्या पाण्यावर बागायती पिके घेतली जात. मात्र, उन्हाळ्यात बोअर व विहिरीचे पाणी झपाट्याने तळ गाठत असल्याने उन्हाळ्यात शेती पडूनच असायची. अजिंंक्यताऱ्यावर दोन वर्षांत जलसंधारणाची कामे झाली. तळ्यांचे पाणी वाढले आणि पायथ्याला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व रहिवाशांच्या आयुष्यात एक चमत्कारच घडला. ज्याठिकाणी बोअर काढणे अंधश्रध्दा मानले जात होते. तसेच कोणी प्रयत्न केला तर सुमारे ५00 फूट खोदल्याशिवाय पाणी लागत नव्हते. विहिरींचे पाणी उन्हाळ्यात तळ गाठत होते. गेल्या दोन वर्षांपूर्वीची ही परिस्थिती. मात्र, जलसंधारणाच्या कामांमुळे आता या परिसराचा कायापालट झाला आहे. बोअरवेल व विहिरींचे पाणी उन्हाळ्यातही खळाळून वाहत आहे. बारमाही बागायत पिके घेतली जावू लागल्याने पायथ्याच्या शेतकऱ्यांनाही या कामाचा लाभ झाला आहे. हे आहेत किमयागार... अजिंक्यतारा ग्रुपच्या माध्यमातून डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांपासून किल्यावर जलसंधारणाचे कामे सुरू आहेत. डॉ. शरद जगताप, डॉ. शरद पाटील, डॉ. चंद्रकांत शेटे, डॉ. राहूल शिरकांडे, महेंद्र जाधव, कैलास बागल, रावसाहेब भोकरे, शरद भोसले, गणेश बोधे, अभय चव्हाण, दादासाहेब कदम, हेमंत देशमुख, दीपक जगताप, मिलींद काटकर, प्रशांत कणसे, अमीत कुलकर्णी, भगवान महिपाल, संतोष महाडिक, रवींद्र पाटेकर, संभाजी पवार, अनिल मोरे, राजेंद्र साबळे, बाळासाहेब शिरकांडे, गुरूदत्त शेजवळ, विठ्ठल सुतार, अविनाश वंजारी, अक्षय शिरकांडे, प्रवीण मालपुरे, पराग भोसले, मनीष पोळ, धनंजय डेरे व गोरे आदी या कामाचे किमयागार आहेत. दोन वर्षांपूर्वी शाहूनगरला खाली विहिरीला पाणी मिळत नव्हतं. उन्हाळ्यात पाणी आटत असे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कटाकटी पाणी मिळायचं. उन्हाळ्यात बागायत करणं म्हणजे दिव्यच होते. आता २५ ते ३0 एकर क्षेत्रावर उन्हाळ्यातही बागायत करता येत आहे. बोअर व विहिरच्या पाणीपातळीत आठ ते दहा फुटांनी वाढ झालेली आहे. - नाना शिंदे, शेतकरी जलसंधारणाची कामे होण्याआधी बोअरवेल अवघे दोन मिनिटे चालायची. आता ती पंधरा मिनिटे चालते. येथेच राहणारे वैभव घोलप यांच्या घरावर असणाऱ्या एक हजार लिटरची टाकी भरण्यासाठी पूर्वी पाऊण तास लागत होता. आता ही टाकी अवघ्या १५ मिनिटात भरते. पाणी अडवा, पाणी जिरवा या कामामुळे जमीनीत मोठे पाणी मुरल्यानेच ही चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे. - भगवान महिपाल, गोडोली अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या मंगळाई देवी मंदिरातलगत पूर्वी एक बोअरवेल काढली होती. या बोअरचे पाणी आटत होते. उन्हाळ्यात देवीसाठी कळशीभर पाणी कटाकटी मिळायचे. उत्सवामध्ये टँकर विकत आणायला लागत असे. मात्र आता २४ तास जरी मोटार सुरु ठेवली तरी बोअरचे पाणी हटत नाही. अजिंक्यताऱ्यावर झालेल्या जलसंधारणाच्या कामाचा मोठा चमत्कार आहे. - सयाजी चव्हाण, मंगळाई देवी मंदिर
गोडोलीच्या शिवारात पाणी खळाळले!
By admin | Updated: January 14, 2015 00:31 IST