भिलारसह गोडवली, राजपुरीमध्ये दहा दिवसांच्या लॉकडाऊन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:36 AM2021-04-19T04:36:38+5:302021-04-19T04:36:38+5:30
पाचगणी : पुस्तकांचे गाव म्हणून जग प्रसिद्ध असलेल्या भिलार गावात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भिलार ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार ...
पाचगणी : पुस्तकांचे गाव म्हणून जग प्रसिद्ध असलेल्या भिलार गावात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भिलार ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार दि.१६ एप्रिल ते मंगळवार दि.२७ एप्रिलपर्यंत दहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला असून, या पाठोपाठ तालुक्याच्या पूर्व भागातील गोडवली, खिंगर, आंब्रळ व राजपुरी या चार गावांतील ग्रामस्थांनी स्वंयस्फूर्तीने दि. १९ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केलेल्या आदेशाला बांधिल राहत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा बसावा, याकरिता स्वयंस्फूर्तीने अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेत जनता कर्फ्यू यशस्वी निर्णय घेण्यात आला. स्थानिक प्रशासन व व्यापारी बांधवांनी भिलारमध्ये कडक निर्बंधांंचा अवलंब करत जनता कर्फ्यूची अमंलबजावणी सुरू केली आहे. यावेळी सरपंच शिवाजी भिलारे, राजेंद्र भिलारे, अनिल भिलारे, भिलार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भिलारे, शशिकांत भिलारे, वैभव भिलारे, गणेश भिलारे, संदीप पवार, राजेंद्र चव्हाण, तलाठी शशिकांत वणवे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
१८भिलार
भिलार येथे जनता कर्फ्यूमुळे निर्मनुष्य झालेला भिलार गावचा मुख्य रस्ता.