बामणोली : परळी खोऱ्यात डोंगराच्या कुशीत वसलेल्या धावली गावच्या वरील डोंगरमाथ्यावर महाकाय दगड एखाद्या काळासारखे आ वासून बसले आहेत. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून दगडाखालच्या जमिनीची धूप होऊन दगड सरकायला लागले आहेत. ते आपल्या घरांचा तर वेध घेणार नाहीत, या भीतीपोटी ग्रामस्थांची झोप उडाली असून, ते भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगररांगामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरडी कोसळणे, जमीन खचणे, पूर येणे, झाड पडणे, विजेचे खांब पडणे, पूल वाहून जाणे आदी अनेक धोकादायक प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्यातच डोंगराच्या कुशीत वसलेल्या धावली, ता. सातारा गावातील वरचे आवाडाच्या वरील डोंगरमाथ्यावर महाकाय दगड जीवघेण्या स्थितीत आहेत.
त्यातच अतिवृष्टीमुळे दगडाखालच्या मातीची धूप झाल्यामुळे महाकाय दगड सरकला आहे. तो आपल्या घरांचा वेध घेतो की काय, या भीतीने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकत त्यांची झोपच उडाली आहे. त्यातच गावच्या आणि वरचे आवडच्या मधोमध असणाऱ्या ओढणारा कच्चा रस्ताच वाहून मोठी चर पडल्याने रस्त्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याचीही जलवाहिनीही तुटून गेली आहे. तसेच पाण्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ते महाकाय दगड हटवावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
चौकट
घराचा घेणार वेध
डोंगराच्या कुशीत धावली गाव असून, वरले आळीच्या वरील डोंगरामध्ये तीन महाकाय दगड आहेत. जमिनीची धूप झाल्याने त्यातील एक दगड सरकू लागला आहे. ते दगड सरकलेच तर थांबण्यासाठी मध्यभागी कोणतीच जागा नसून तीव्र उतार असल्याने ते आमच्या घरांचा वेध घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आवाडातील नागरिकांची झोप उडाली आहे. रात्रभर जागरण करताहेत. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून डोंगरातील धोकादायक दगड हटवावेत, अशी मागणी धावलीतील ग्रामस्थ अनिल जाधव यांनी केली आहे.
फोटो
२०बामणोली
सातारा तालुक्यातील धावली गावच्या शेजारच्या डोंगरावर असलेला महाकाय दगड पडण्याच्या अवस्थेत आहे. (छाया : लक्ष्मण गोरे)