कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत असणाऱ्या सिंदळ ओढ्यात विद्यानगर परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, टाकाऊ कचरा टाकत असल्यामुळे त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा टाकू नये, असे कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीने सांगूनही वेळोवेळी रात्रीचा कचरा टाकला जात आहे. यापुढे कचरा टाकणाऱ्यांवर पाळत ठेवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.
वानरांचा उपद्रव वाढला
तांबवे : किरपे परिसरात वानरांचा उपद्रव वाढला आहे. शिवारातील पिकांवर ते डल्ला मारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील काही शेतकऱ्यांवर वानरांनी हल्ला करण्याचेही प्रकार घडले होते. वन विभागाने वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
मंडईमुळे धोक्यात वाढ
कऱ्हाड : शहरातील मुख्य भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेत पालिका प्रशासनाने या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. मात्र, अनधिकृतपणे काही ठिकाणी भाजी विक्रेते बसत असून, त्याठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्याठिकाणी प्रशासनाने अटकाव करण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मंडईमुळे धोक्यात भरच पडत असून, प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे बनले आहे.
भाजीपाल्याच्या दरात वाढ
कऱ्हाड : सध्या परिसरात भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी आवक कमी असल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. वांगी, वाटाणा, पावटा, दोडका, कारली यांचे दर वाढले आहेत. लॉकडाऊनमुळे शेतकरी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी शहरात येत नाहीत. परिणामी, उपलब्ध भाजीपाल्याची व्यापाऱ्यांकडून मोठ्या किमतीवर विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.
झाडांच्या फांद्या तोडल्या
मलकापूर : ढेबेवाडी फाटा ते चचेगाव हद्दीपर्यंतच्या दुभाजकामधील झाडांच्या फांद्या मलकापूर पालिकेच्या वतीने तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे विस्तारलेल्या फांद्यांचा होणारा त्रास आता काही प्रमाणात कमी झाला आहे. कऱ्हाड ते ढेबेवाडी मार्गावरील दुभाजकामध्ये झाडे लावल्यात आली आहेत. सध्या ही झाडे मोठी झाली आहेत. या मार्गावरील विविध ठिकाणी या झाडांच्या फांद्या रस्त्यावर पसरत असल्यामुळे भरधाव वाहनांना फांद्यांमुळे धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पालिकेकडून झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या.
तुळसण मार्गावर खड्डे
कऱ्हाड : उंडाळे विभागातील उंडाळे ते तुळसण फाटा या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून, पाईपलाईनसाठी रस्त्यामध्ये चर काढण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. उंडाळे ते तुळसण फाटा हा रस्ता शेतकऱ्यांनी आपली जमीन देऊन केला आहे.