पाचगणी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. मास्कचा योग्य वापर करावा, त्याचबरोबर उत्सव काळात रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले.
येथील घाटजाई विद्यामंदिर येथे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते. यावेळी वाई उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जान्हवे-खराडे, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, महावितरणचे अधिकारी सचिन बाचल, एस. के. राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.
शीतल जान्हवे म्हणाले, ‘गणेशोत्सव साजरा करताना तुम्हाला कोणती अडचण येऊ नये यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. सार्वजनिक मंडळांनी ज्या काही परवानग्या आहेत त्या रीतसर घ्याव्यात. तिसरी लाट आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. गर्दी होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. कोरोनाचा प्रसार होऊ नये, याची काळजी घ्यावी. दर्शन मंडपात सॅनिटायझर करावे. प्रत्येक मंडळाने आपले मंडळ हाॅटस्पाॅट होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.’
सतीश पवार म्हणाले, ‘मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी काळजी घ्यावी.’
मुख्याधिकारी दापकेकर व पल्लवी पाटील यांनीही मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पवार यांनी आभार मानले. या बैठकीला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.