मसूर : ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत कोरोना प्रतिबंधक उपायोजना करून उत्सव साधेपणाने साजरा करावा, अनावश्यक खर्च टाळून मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजन मशीन वाटप, रक्तदान शिबिर यासरखे सामाजिक उपक्रम राबवावेत,’ असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले.
हेळगाव (ता. कऱ्हाड) येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपसरपंच संजय सूर्यवंशी, सदस्य कौस्तुभ सूर्यवंशी, विक्रम कुंभार, माजी सरपंच बाळासाहेब जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव संकपाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गोरड म्हणाले, ‘माणसाच्या जिवापेक्षा कोणताही सण, उत्सव मोठा नाही, ही जाणीव ठेवावी. गतवर्षीही कोरोनाच्या काळात येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले होते. यापुढेही असे सहकार्य करावे. गावातील युवकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामसुरक्षा दलात सहभागी व्हावे.’
कार्यक्रमास यात्रा कमिटीचे पदाधिकारी व गावातील सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच बाळासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे यांनी आभार मानले.
०१मसूर गणपती
हेळवाक येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करताना अजय गोरड व इतर मान्यवर उपस्थित होते.