प्रसन्न राणे- सावंतवाडी --कोकणातील संस्कृतीचे वैशिष्ट्य बनलेला गणेशोत्सव घराघरांतील वातावरणाला चैतन्यमयी आनंद देणारा असतो. याची परंपरा कोकणात कित्येक वर्षापासून सुरू आहे. येथील परंपरागत गणेशोत्सवातील मानाच्या गणपतीपैंकी सावंतवाडीतील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गणपती मानाच्या गणपतींपैकी एक आहे. सर्व धर्मीयांतून या गणपतीची केली जाणारी पूजाअर्चा जिल्ह्यात नावलौकिक करून आहे. १९०६ ला सालईवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला. यंदा या मंडळाने ११० व्या वर्षात पदार्पण केले आहे. एकवीस दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात कोकणवासीयांसह कोल्हापूर, सांगली, बेळगाव, गोवा येथीलही भाविक मोठ्या उत्साहाने यामध्ये सामील होतात. शिवाय दर्शनासाठी रांगाही सलग एकवीस दिवस येथे पाहावयास मिळतात.सालईवाडा येथे कै. विष्णुशेठ सापळे व कै. सीतारामशेठ बांदेकर यांनी १९०६ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन केले. सापळे कुटुंबीयांच्या वास्तूमध्ये कोकण भागातील पहिला गणेशोत्सव सुरू केला. सालईवाडा भागातील सर्वच मंडळींनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेऊन गणेशाचे पूजन केले. जात-पात, धर्म, भेदभाव मनाशी न बाळगता सर्वांना गणरायाचे दर्शन घडावे, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचे पूजन करण्यात आले. प्रत्येकाच्या घरी गणरायाचे आगमन झालेले असते. मात्र, बाहेरून येणाऱ्या पर्यटक किंवा विविध धर्मांतील लोकांना श्री गणरायाचे दर्शन मिळावे, यासाठी कोकणात पहिला गणेशोत्सव या मंडळाने सुरू केला, तर २१ दिवस भक्तिभावाने, श्रद्धेने गणरायाचे पूजन केले जाते.१९४० ते १९५० या कालखंडात सि. द. पडते (दादा), अण्णा सावंत, भास्कर निखार्गे, गुंडू बांदेकर, सखाराम (चिटलिंग) चौकेकर, श्याम चिंगळे, दत्ता वेंगुर्लेकर, भाऊ सापळे, तात्या सापळे, मोतिराम नार्वेकर, पांडुरंग ठाकूर, काशिनाथ कुडतरकर, दादा भोसले, आबा पेडणेकर, जगन्नाथ व विश्वनाथ तळवणेकर यांनी मंडळातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सवाची जबाबदारी सांभाळली. सुरुवातीला आकर्षक मूर्ती तयार करणे व गणपतीपुढील सजावट करण्याची जबाबदारी कै. आबा पेडणेकर यांनी सांभाळली होती. १९५१ ते १९८० या काळात मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सि. द. पडते यांनी सांभाळली. १९६० ते ७० या दशकात सालईवाड्यातील सर्व महिलांना एकत्र आणण्याचे काम शालिनी नाटेकर व लता पेडणेकर यांनी केले. १९७० पासून ही जबाबदारी कमल विर्नोडकर यांनी समर्थपणे सांभाळली. तसेच १९८१ ते १९९० या काळात सालईवाड्यातील उत्साही तरुण अमरनाथ सावंत व राजा स्वार यांना मंडळामध्ये सामावून घेण्यात आले व श्री गणेशोत्सवाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.सापळे कुटुंबीयांच्या ज्या वास्तूमध्ये हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला, ती संपूर्ण वास्तू जमिनीसह १९९० मध्ये श्रीमती राधाबाई केशव सापळे यांनी त्यांचे पती कै. केशव विष्णू सापळे यांच्या स्मरणार्थ मंडळाच्या स्वाधीन बक्षीसपत्राने केली.सध्या या मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सापळे, उपाध्यक्ष अॅड. दीपक नेवगी, खजिनदार अशोक बांदेकर, सचिव गुरुदास पेडणेकर, सहसचिव साबाजी नार्वेकर तसेच सदस्य कमल विरनोडकर, अमरनाथ सावंत, अपर्णा खानोलकर, शिवप्रसाद बांदेकर तसेच यावर्षीचे उत्सव समितीचे अध्यक्ष राजा स्वार उत्सव दिमाखात साजरा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.भरगच्च कार्यक्रमांचा जागरसालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव हा २१ दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसात या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. रोज सायंकाळी भजनांच्या मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रमाला तर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याशिवाय येथे भजनांचा डबलबारीचा कार्यक्रमही पंचक्रोशीत नावलौकिक करून आहे. विसर्जनादिवशी गणरायाची शहरातून वाजतगाजत काढण्यात येणारी मिरवूणक पाहावयास जिल्ह्यातील गणेशभक्तांचा जनसागर उसळलेला असतो. मोती तलावात गणरायाचे श्रद्धापूर्वक विसर्जन केले जाते.
सालईवाड्यातील गणेशोत्सव
By admin | Updated: October 4, 2015 23:45 IST