सातारा : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत वाढलेले मतदारच बहुतांशी मतदारसंघात परिणामकारक ठरणार आहेत. जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत पाच वर्षांत वाढलेले मतदान २.६८ लाख इतके आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १८ ते १९ या वयोगटांतील वाढलेल्या मतदारांची संख्या १ लाख ५१ हजार ६४० इतकी आहे. जिल्ह्यात २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान लक्षात घेता, या निवडणुकीत त्यामध्ये वाढ झाली आहे. गतवेळी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत एकूण मतदारसंख्या २० लाख ९० हजार ५०० इतकी होती. मात्र, यावेळी ही मतदारसंख्या २३ लाख ५९ हजार ४१३ इतकी झाली आहे. परिणामी जिल्ह्यात पाच वर्षांत वाढ झालेले मतदान २ लाख ६८ हजार ९१३ इतके आहे.जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांत गेल्या वर्षभरात वाढलेले ४४ हजार नवमतदार वाढले आहेत. वाढलेले मतदार १८ ते १९ या वयोगटांतील असून, जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. जिल्ह्यात माण आणि पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नवमतदार वाढले आहेत. पाटणमध्ये वाढलेले नवमतदार ६,३८० तर माणमध्ये वाढलेले नवमतदार ६,१९६ इतके आहेत. सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, प्रत्येक मतदारसंघातील मतदार संख्या सरासरी पावणेतीन ते तीन लाखांच्या आसपास आहे. जिल्ह्यात आजमितीस सर्वाधिक ३.१४ लाख मतदारसंख्या वाई विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी २.७४ लाख मतदान कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात आहे. (प्रतिनिधी)
‘नवमतदार’ही ठरविणार भावी आमदार
By admin | Updated: October 14, 2014 23:22 IST