वाई : ‘सिद्धनाथवाडीतील धनगर समाजाचे कुलदैवत असणारे बिरोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले होते. गतवर्षीच्या वाई नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत या समाजाला या मंदिराच्या सभागृहाचे काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण झाला असून, त्याची आज वचनपूर्ती, कर्तव्यपूर्तीचा आनंद झाला आहे,’ असे उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.
वाई येथील बिरोबा मंदिराचा जीर्णोद्धार नगरोत्थानमधून ३३ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार, नगराध्यक्ष अनिल सावंत, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप बाबर, नगरसेवक भारत खामकर, राजेश गुरव, चरण गायकवाड, कांताराम जाधव, कार्यक्रमाच्या संयोजक रेश्मा प्रदीप जायगुडे, नगरपालिकेचे बांधकाम अभियंता, सचिन धेंडे, मोहन काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘वाई नगरपालिका कारभार करीत असताना गेले पाच राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एका मताने पडल्याची खंत असून, शहराचा विकास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले; परंतु थोड्या दिवसांसाठी आपल्याकडे नगराध्यक्षपद आल्याने विकासकामाला वेग आला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने वाई शहरासाठी लागणारा करोडो रुपयांचा विकास निधी आणण्यात यश आले आहे. शहरातील प्रवेशव्दारावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. वाई शहरातील विकास कामात कोरोनाची महाभयंकर लाट असताना खंड पडलेला नाही.’
प्रास्ताविकात नगरसेविका रेश्मा जायगुडे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. यावेळी नानासाहेब दोरकाटे, संजय चव्हाण, प्रदीप जायगुडे, विष्णू बरकडे, विलास देशमुख, ॲड. रवींद्र भोसले, लक्ष्मणराव खरात, नारायण बरकडे, बापूराव खरात, जयवंत कचरे, सुधीर खरात, अशोकराव सूर्यवंशी, युगल घाडगे, शंकर वाघ, सुनील चौधरी या ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संदीप प्रभाळे यांनी सूत्रसंचालन केले. अशोकराव खरात यांनी आभार मानले.