येवला : तालुक्यातील धानोरा येथील मातोश्री पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांनी मैत्रीदिनी कर्णबधिर विद्यार्थ्यांशी मैत्री केली. मैत्री म्हणजे केवळ हातात मैत्रीचा धागा बांधणे नव्हे तर त्यात आत्मभाव असायला लागतो. याचे दर्शन या उपक्रमातून मातोश्रीच्या विद्यार्थ्यांनी घडविले.अंगणगाव येथील मायबोली कर्णबधिर विद्यालयात सोमवारी मैत्री दिनानिमित्ताने मातोश्रीच्या भावी अभियंत्यांनी सामाजिक ऋण व्यक्त केले. यातून युवा पिढीवर बेजबाबदारपणाचे ताशेरे ओढले जातात पण याला आम्ही अपवाद असल्याचे या तृतीय वर्षातील इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.पॉलिटेक्निच्या विद्यार्थ्यांनी मायबोली कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत मैत्री करून, गप्पा मारत मैत्री दिन साजरा केला. या दिनानिमित्त होणाऱ्या अवास्तव खर्चाला फाटा देत मायबोलीतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी विविध तक्ते देऊन त्यांचा आनंद द्विगणित केला. तसेच विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करत त्यांच्या मनात मैत्रीचा धागा बांधला. मायबोलीच्या विद्यार्थ्यांनीही या मोठ्या भावा-बहिणींची मैत्री दिलखुलासपणे स्वीकारली. यावेळी मायबोलीचे संस्थापक अर्जुन कोकाटे, मुख्याधापक बाबासाहेब कोकाटे, मातोश्री पॉलिटेक्निकचे प्राचार्य गीतेश गुजराथी, विभागप्रमुख संदीप कोल्हे, प्रा. नितीन गुजर, नंदकुमार गायकवाड उपस्थित होते. विद्यार्थी सनि राजपाल, तुषार पाटील, अभिषेक पाटील, विजय पगार, किरण सालपुरे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. (वार्ताहर)
मायबोली कर्णबधिर विद्यालयात मैत्री दिन
By admin | Updated: August 9, 2016 22:41 IST