वेळे : कवठे येथील स्वातंत्र्यसैनिक श्रीरंग मारुती जगताप (वय ९८) यांचे अल्प आजाराने बुधवारी निधन झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारा कवठे गावातील अखेरचा स्वातंत्र्यसैनिक गेल्याने कवठे व वहागाव या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
थोर स्वातंत्र्यसैनिक किसन वीर व यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून दादांचा नामोल्लेख केला जातो. स्वातंत्र्यानंतर किसन वीर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. किसन वीर महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आर्थिक अडचण येत असताना ती दूर व्हावी म्हणून श्रीरंग जगताप यांनी स्वतःची जमीन त्या काळी सांगली बँकेस तारण ठेवली होती. यशवंतराव चव्हाण, किसन वीर व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग बोराटे यांच्या भूमिगत चळवळीच्या काळात जिल्ह्यातील कार्यक्रमाचे पूर्वनियोजन करण्याचे व पार पडण्याचे काम दादांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केले होते.