खंडाळा : उन्हाळा सुरू होताच भूजलपातळी कमी होत चालली आहे. खंडाळा शहरात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभराच्या पाण्यासाठी चणचण भासत आहे . शहरातील लोकांना गरजेपुरते पाणी मिळावे यासाठी खंडाळा शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने टॅंकरद्वारे मोफत पाणीवाटप सुरू केले आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळत आहे.
खंडाळा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी खालावली असल्यामुळे पाणीपुरवठा नियमित करणे सध्या अशक्य होत आहे; परंतु शहरवासीयांना पाण्याची कमतरता भासू नये या सामाजिक भावनेतून युवक अध्यक्ष प्रकाश गाढवे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणीवाटप सुरू केले आहे. शहरातील गरजवंतांपर्यंत घरपोहोच पाणी मिळत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
या पाणीवाटप योजनेच्या शुभारंभप्रसंगी वाई विधानसभा युवक अध्यक्ष प्रकाश गाढवे, खंडाळा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मनीष गाढवे, उपाध्यक्ष सत्यवान जाधव, रत्नकांत भोसले, खंडाळा शेतकरी संघटना अध्यक्ष अजितअप्पा गाढवे, उपाध्यक्ष मारुती खंडागळे, सचिन खंडागळे यांसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.