सातारा : कंपनीची डिलरशिप देण्याच्या कारणातून सातारा शहरातील एकाची २३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरातील व्यक्तीला एका कंपनीच्या गाड्यांची डिलरशिप हवी होती. त्यासाठी संबंधित कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करण्यात आला होता. २ ऑगस्ट रोजी संबंधिताला एका मोबाइलवरून कॉल आला, त्याने कंपनीतून बोलत असून जैन नाव सांगितले. त्यानंतर ७ ऑगस्टला जैन याने मोबाइलवरून कॉल करून दुकानाच्या ठिकाणचे फोटो पाठविण्यास सांगितले. तसेच त्याच दिवशी मेलवर डिलरशिपसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे संबंधिताने अर्ज केला. त्यानंतर संबंधित वारंवार जैन याच्याशी डिलरशिपबद्दल विचारणा करीत होते.
३१ ऑगस्ट रोजी पुन्हा संबंधिताला एका मोबाइलवरून कॉल आला. त्या वेळी त्याने अशोक शर्मा असे नाव सांगून कंपनीतून बोलत असल्याचे म्हटले. त्याने संबंधिताकडे काही कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर १ लाख ३५ हजार रुपये तत्काळ भरण्यास सांगितले. त्यासाठी एका बँकेचा खाते क्रमांकही दिला. त्याप्रमाणे १ सप्टेंबरला पैसे भरण्यात आले. त्यानंतर शर्मा नावाच्या व्यक्तीने कंपनीच्या गाड्या देणे व शोरूम सुरू करून देण्यासाठी पैसे मागितले. त्यामुळे संबंधिताने मित्र, नातेवाइकांकडून पैसे घेऊन दिलेल्या बँक खात्यावर सर्व मिळून २३ लाख ५० हजार रुपये भरले.
१५ सप्टेंबरपर्यंत संबंधित कंपनीचे लोक साताऱ्यात आले नाहीत. त्यामुळे संबंधिताने अशोक शर्मा याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता तो लागला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधिताने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी जैन आणि अशोक शर्मा (पूर्ण नाव, पत्ता नाही) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक पतंगे तपास करीत आहेत.
.................................................