सातारा : खंबाटकी घाटात एकेरी वाहतूक असताना विरुद्ध दिशेने लक्झरी बस भरधाव वेगाने चालविल्याने अपघात होऊन प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाला जिल्हा न्यायालयाने चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विजय एकनाथ चोरगे (वय २९, रा. येवती, ता. कऱ्हाड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, चालक विजय चोरगे हा २२ नोव्हेंबर २०१५ ला लक्झरी बस (एमएच - ०४ जीपी ३५३५) घेऊन मुंबई ते चांदोली अशी जात होता. त्यावेळी खंबाटकी घाटात एकेरी वाहतूक होती. तरीही बस विरुद्ध दिशेने नेल्यास अपघात होऊ शकतो, हे माहीत असूनही चोरगे याने बस विरुद्ध दिशेने बोगद्याकडे भरधाव वेगात चालवली. या बसने समोरून येणार्या लक्झरी बस (एमएच ०७ जीपी ९७७७) ला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दीपक शिवाजी निकम (४०, रा. शिराळा, जिल्हा सांगली) यांचा मृत्यू झाला, तर दोन्ही बसमधील ४५ प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले होते. दोन्ही लक्झरींचे चार लाखांचे नुकसान झाले होते. या घटनेला स्वतः कारणीभूत असूनही चोरगे याने अपघाताची खबर पोलिसांना न देता व जखमींना औषधोपचारास न नेता तो पसार झाला होता.
दरम्यान, या अपघाताची फिर्याद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे तसेच शास्त्रोक्त पुरावा प्राप्त करून मुदतीत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने विजय चोरगे याला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या न्यायालयामध्ये झाली. सहायक सरकारी वकील आशीर्वाद कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून खंडाळा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सोमनाथ कुंभार, जिल्हा न्यायालयातील प्रॉसिक्युशन स्क्वाडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, घारगे, हवा शेख, बेंद्रे, शिंदे, कुंभार, घोरपडे, भरते यांनी सरकारी वकील यांना सहकार्य केले.
फोटो आहेः विजय चोरगे