दरम्यान, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी या पुलाची पाहणी करून आठवड्यात पूल हलक्या वाहनांसाठी खुला केला जाईल, असे स्पष्ट केले. या वेळी उदयसिंह पाटील, शिवराज मोरे, नगरसेवक राजेंद्र माने, झाकीर पठाण, सिद्धार्थ थोरवडे, रमेश वायदंडे, ज्ञानदेव राजापुरे, पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, नगर अभियंता एन. एस. पवार यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कऱ्हाडला दैत्यनिवारणी मंदिरानजीक ब्रिटिशकालीन जुना पूल आहे. या पुलाच्या मजबुतीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मजबुतीकरणानंतर या पुलावरून चारचाकी वाहतूक सुरू होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, त्याबाबत कसलीच कार्यवाही झाली नाही. पुलावरून केवळ दुचाकी व पादचाऱ्यांची ये-जा सुरू आहे. गत काही दिवसांपूर्वी पुलाची ‘स्पॅन लोड टेस्ट’ घेण्यात आली. या चाचणीत पूल किती वजन पेलू शकतो, याची तपासणी झाली. त्यासाठी दोन दिवस हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या दोन दिवसांत पुलावरून मुरूम, वाळू भरलेले डंपर वारंवार फिरविण्यात आले. एकाच वेळी जास्त प्रमाणात डंपर पुलावर उभे करण्यात आले. तसेच दिवसा आणि रात्रीच्या वातावरणाचा पुलावर परिणाम होतो. त्यानुषंगानेही रात्री आणि दिवसाही वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. चाचणीचे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुलाची पाहणी करून हा पूल पुढील आठवड्यात चारचाकी हलक्या वाहतुकीस खुला होईल, अशी माहिती दिली.