शिरवळ : माणसाच्या आयुष्यामध्ये वेग व वेळ या दोन गोष्टी महत्त्वाच्या समजल्या जातात. ही परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतच असते. मात्र वेगाशी व वेळेशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न व्यक्तीने केला तर त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. असेच काहीसे शिरवळ येथे घडलेल्या अपघाताबद्दल म्हणावे लागेल. जीपच्या भरधाव वेगाने सहा मित्रांपैकी चार जीवलग मित्रांच्या आयुष्यांची दोरी तुटली गेली आहे. तर एक मित्र मृत्यूशी झुंज देत आहे. भोर तालुक्यातील सारोळा, गुणंद, राऊतवाडी येथील सहा जिवलग मित्र हनुमंत निगडे, गणेश बोणे, दस्तगीर नाकनिगल, अतुल बरकडे, अमित पवार आपला मित्र प्रशांत राऊत याने आणलेल्या दुचाकीचा आनंद साजरा करण्यासाठी खंडाळा याठिकाणी जेवणाकरिता जीप (एमएच-४२ -बी-११४०) ने बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान आले होते. यावेळी आणलेली नवीन कोरी दुचाकी मित्रांच्या प्रेमाखातर शिंदेवाडी, ता. खंडाळा येथील एका पेट्रोल पंपावर लावत प्रशांत राऊत हाही मित्रांच्या बरोबरीने जीपमध्ये बसला. यावेळी नवीन गाडीचा आनंदोत्सव साजरा करत असताना आपल्यासाठी ही काळरात्र तर ठरणार नाही ना याची साधी पुसटशीही कल्पना संबंधितांना नव्हती. जेवण करून परत सारोळा, जि. पुणे येथील घराकडे भरधाव वेगाने व वाऱ्याशी स्पर्धा करत जीपमधून परतणाऱ्या सहा जिवलग मित्रांवर शिरवळ येथील शिर्के कंपनीजवळ काळाने घाला घातलाच. याठिकाणी अपघातामध्ये सहा जिवलग मित्रांपैकी चार जणांच्या आयुष्याची दोरी कायमची तुटली. तर जीपचालक असलेला मित्र रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. एकूणच जीपचा वेग मित्रांच्या आयुष्याची ताटातूट करत सहा कुटुंबांना वेदनाची झालर देऊन गेला. अपघातानंतर जीपमध्ये सापडलेले सुमारे अडतीस हजार रुपये पोलिसांनी कुटुंबियांना सुपुर्द केले. यावेळी कुटुंबियांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली. जर हा अपघात शिरवळ ऐवजी दुसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीत घडला असता, तर या पैशांवर आम्हाला पाणी सोडावे लागले असते, असे म्हणत पोलिसांचे आभारही मानले. (प्रतिनिधी) शिरवळ पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा...शिरवळ, ता. खंडाळा येथे जीपला मोठा अपघात झाल्याची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. यावेळी शिरवळ येथील खासगी रुग्णालयात जखमींना व मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. त्यावेळी रुग्णवाहिकेवर चालक नसल्याने त्यांनी असमर्थता दर्शविली. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनचे हवालदार संतोष मठपती, अमोल जगदाळे यांनी कर्तव्यदक्षता दाखवत संबंधित रुग्णवाहिका स्वत: घटनास्थळी चालवत नेत गंभीर जखमी झालेल्या हनुमंत निगडे याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. सध्या निगडे हा मृत्यूशी झुंज देत असून, अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
भरधाव वेगाने घेतला चौघांचा बळी!
By admin | Updated: March 4, 2016 00:51 IST